अभोणा : प्रतिनिधी अभोणा येथे नांदुरी रस्त्यावरील नववसाहतीत बुधवारी रात्री चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. त्यात अंदाजे दोन लाखांचा मुद्देमाल व एक दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील जनाबाई चव्हाण यांचे घराच्या खिडकीचे गज कापून घरात घूसलेल्या चोरट्यांनी देवघरातील देव्हार्यात ठेवलेली पाच हजारांची रोकड व पाच ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले. ललित भोये यांचे घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, पण हाती काहीही न लागल्याने चोरट्यांनी सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकल्या. हेमंत बागूल यांच्या घरातून 40 हजार रुपयांची रोकड लांबविली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोतीलाल गावीत यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले 50 हजार रुपये चोरून नेले. अशा प्रकारे चार घरफोड्यांनंतर चोरट्यांनी कन्सरा चौकात हरिश्चंद्र चव्हाण यांची होंडा कंपनीची दुचाकी घरासमोरून चोरून नेली. एकाच रात्री या पाच घटना घडल्या. अभोणा व परिसरात आधीच बिबट्यांची दहशत पसरलेली असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, तसेच वस्तू विकण्यासाठी गांवभर फिरणारे अनोळखी फेरीवाले व इतर संशयित व्यक्तींची दखल घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. या घटनेची पोलिसांत अद्याप नोंद झालेली नाही.
Four house burglaries, two-wheeler theft in one night in Abhona