प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली
चांदवड : वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड येथील राहूड घाटात शनिवारी (दि. 27) भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनर थेट रस्त्याखाली उलटला. मात्र, या कठीण प्रसंगात चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे महामार्गावरील इतर चार ते पाच वाहने थोडक्यात बचावली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंटेनर राहूड घाटातून उतरत असताना अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. उतारावर कंटेनरचा वेग वाढल्याने समोर असलेल्या वाहनांना मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, चालकाने इतर वाहनांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला आणि रस्त्यावरील वाहनांना हुलकावणी देत कंटेनर संरक्षक भिंत तोडून रस्त्याखाली नेला.
या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि चांदवड अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू केले. पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून राहूड घाटात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तीव्र उतार आणि वळणांमुळे हा भाग आता ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जात आहे. येथे ब्रेक
फेल होणे किंवा अतिवेगामुळे वारंवार अपघात घडत आहेत. प्रशासनाने या वाढत्या अपघातांची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Container overturned due to brake failure at Rahud Ghat