महायुतीतच संघर्ष?, एकमेकांसमोर उभे ठाकणार
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास बाकी असताना अद्याप भाजप-शिंदेसेनेची युती न झाल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा आहे. दरम्यान, नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचे भाऊ म्हणजे मंत्री गिरीश महाजन व शिंदेसेनेचे मंत्री दादा भुसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिंदेसेनेने मागील निवडणुकीतील चुका टाळून नगरसेवक संख्या वाढविण्याच्या द़ृष्टीने पावले टाकली आहेत. भाजपच्या संकटमोचकांना गतवेळेपेक्षा पक्षाचा स्ट्राइक रेट वाढवायचा आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या भाऊ व शिंदेसेनेच्या दादांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.
भाजपतील जोरदार इनकमिंगमुळे पक्षात फुगवटा झाला आहे. मात्र, निष्ठावान विरुद्ध उपरे असा अंतर्गत संघर्ष भाजपमध्ये रंगला आहे. त्याचा निवडणुकीत पक्षाला फटका बसू नये, याची खबरदारी मंत्री महाजनांना घ्यावी लागणार आहे. यात त्यांची चांगलीच कसोटी लागणार आहे. शिवाय तपोवनातील झाडांचा मुद्दा महाजनांच्या अवतीभोवती फिरवला जातो आहे. दरम्यान, महाजन यांनी आक्रमकपणे त्यांची पावले नाशिक महापालिकेसाठी टाकली आहेत. त्यांच्या वाटेत मात्र स्वपक्षातल्याने निष्ठावानांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्यांना उमेदवारी दिल्यास यातून चुकीचा संदेश जाण्याची भीती व्यक्त केली आहे. महायुती न झाल्याने भाजपला मित्रपक्ष शिंदेसेनेसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच ठाकरे- मनसेचे आव्हान असेल. हेच सूत्र शिंदेसेनेबाबत असणार आहे. 2017 च्या निवडणुकीवेळी शिवसेनेचीच मनपात सत्ता येणार असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. शिवाय शिवसेनेच्या तेव्हाच्या पदाधिकार्यांनीदेखील सत्तास्थापनेचा दावा केला होता. मात्र, निकालात भाजपने बाजी मारत 66 जागा मिळविल्या होत्या. त्यावेळी महाजनांचे संघटनकौशल्य दिसले होते. आताही नाशिकची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. शंभर प्लसचा नारा दिला असला, तरी महाजनांपुढे मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेचे कडवे आव्हान असेल. त्याचबरोबर ठाकरे बंधूंच्या पक्षाचा सामना करावा लागेल. मात्र, भाजपचे भाऊ व शिंदेसेनेचे दादा यांच्यातील संघर्षाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
शिंदेसेनेला मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत शिंदेसेनेने भाजपला धोबीपछाड दिला. हा निकाल भाजपसाठी अनपेक्षित असाच होता. नगरपलिका निवडणुकीत शिंदेसेनेला हलक्यात घेण्याचा फटका भाजपला बसल्यानंतर तीच चूक ते महापालिका निवडणुकीत करणार नाहीत. दरम्यान, भाजपतर्फे दिग्गजांना पक्षात घेऊन पॅनल मजबूत केले जात असून, या निवडणुकीद्वारे भाजप शिंदेसेनेला मर्यादित ठेवण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
The reputation of the BJP-Shinde Sena brothers is at stake.