प्रभाग 1 ते 6 मध्ये एकूण 126 अर्ज, आज अंतिम दिवस असल्याने गर्दी होण्याची शक्यता
पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, मंगळवारी (दि.30) हा शेवटचा दिवस असल्याने पक्षाचा एबी फार्मची प्रतीक्षा करताना एक दिवस आधीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार्यांची संख्या वाढली. अनेक माजी नगरसेवकांसह नवोदित इच्छुकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धिश निमसे, गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते, माजी नगरसेविका पूनम सोनवणे, सुनीता शिंदे, रुची कुंभारकर, उल्हास धनवटे, जयश्री धनवटे, नंदिनी बोडके, दिगंबर धुमाळ, चित्रा तांदळे, गोकुळ काकड आदींचा उमेदवारी अर्ज दाखल करणार्यांमध्ये समावेश होता. आज, मंगळवार (दि.30) रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पंचवटीतील प्रभाग 1 ते 3 मध्ये 76, तर प्रभाग 4 ते 6 मध्ये 50, असे एकूण 126 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
अवघा एकच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असल्याने पंचवटी विभागीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे सोमवारी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस व सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
अर्ज दाखल करण्यासाठी येणार्यांची खात्री करूनच मग त्यांना प्रवेश दिला जात होता. समर्थकांकडून आत जाण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रवेशद्वारावर पोलीस आणि समर्थकांमध्ये वारंवार खटके उडत होते. प्रवेशद्वारासमोर गर्दी होत असल्यामुळे रस्त्यावरून जाणार्या वाहनांची कोंडी होत होती. त्यामुळे पोलिसांनी येथील गर्दी हलवली. काही उमेदवारांच्या सोबत दोनपेक्षा जास्त जण येत असल्यामुळे काही वेळा गर्दी वाढत होती. बाहेर पोलिसांची, तर आत इच्छुकांची गर्दी झाली होती. दुपारी तीन वाजता अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आले.
भाजप इच्छुकांच्या चेहर्यावर वाजले बारा
भाजपकडे पंचवटी विभागातील सहाही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच अनेक माजी नगरसेवकांची आणि आयारामांची मेगाभरती भाजपमध्ये झाली आहे. त्यामुळे अनेक विद्यमानांसह निष्ठावंतांंची कोंडी झाली आहे. भाजपने उमेदवारी जाहीर न केल्याने भाजपच्या इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज जरी दाखल केले आहेत. परंतु एबी फॉर्म जोपर्यंत हातात मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मनात धाकधूक वाढल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे अनेक विद्यमानांसह इच्छुकांच्या चेहर्यावरही बारा वाजल्याचे दिसले.
चोख पोलीस बंदोबस्त
निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज (दि. 29) व उद्याचा (दि. 30) दिवस शिल्लक राहिल्याने पंचवटीतील विभागीय कार्यालयाच्या आवारातील निवडणूक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता होती. त्यादृष्टीने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पोलीस निरीक्षक ज्योती आमणे, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचार्यांनी प्रवेशद्वाराजवळ चोख बंदोबस्त ठेवला होता.
उमेदवारी कोणाला मिळते याची उत्सुकता
महानगरपालिका निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भाजपकडे सर्वांत लक्षणीय संख्या असल्याने उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे उमेदवारांसह इच्छुकांचेही डोळे लागले आहेत. भाजपची उमेदवारी न मिळाल्यास भाजपचे निष्ठावंत आणि विद्यमान काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी काय करतात, याचीही सर्वांना उत्सुकता आहे.
आहे तिथंच सुखात होतो
नाशिक महानगरपालिकेच्या निडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील एका माजी नगरसेविकेच्या कुटुंबीयांसह काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याअगोदर त्यांच्या कुटुंबातील दिवंगत सदस्य अपक्ष नगरसेवक होते. भाजपमध्ये प्रवेश तर केला. मात्र, उमेदवारीच्या बाबतीत निर्णय होत नसल्याने त्यांची चलबिचल वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांतील एका सदस्याने मात्र आपण होतो तिथंच सुखी होतो, असे म्हणत मनात खदखदणारी भावना व्यक्त करत मन मोकळे केले.
माजी नगरसेवक प्रवेशद्वाराच्या बाहेर
पंचवटी विभागातील काँग्रेस पक्षाचे जुने ज्येष्ठ नगरसेवक लक्ष्मण धोत्रे हेही त्यांच्या घरातील व्यक्तीचा नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी आले असता, पोलिस व सुरक्षारक्षकांनी अडवले. त्यांनी तसे सांगण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही प्रवेशद्वाराच्या बाहेर जावे लागले.
लक्ष्मी ताठे वंचित आघाडीकडून लढणार
शिवसेना शिंदे गटातील सक्रिय पदाधिकारी म्हणून काम केलेल्या लक्ष्मी ताठे यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असताना त्यांना वगळण्यात आल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी करण्याचे निश्चित केले आहे. उमेदवारीसाठी त्यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली असता, नाशिकच्या पदाधिकार्यांनी त्यांना टाळल्याने त्यांनी शब्दसुमनांची लाखोली वाहत वंचितचा मार्ग निवडला.
Applications of current and former corporators in Panchavati filed without 'AB' form