डझनहून अधिक नगरसेवकांना भाजपाने दाखवला घरचा रस्ता

सक्रिय नसल्याने सर्व्हेमध्ये रेड सिग्नल; काहींचे ऐनवेळी पक्षांतर

नाशिक : प्रतिनिधी

शंभर प्लससाठी भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ऐनवेळी निर्णय घेऊनही इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे जुन्या-नव्यांचा मेळ घालताना पक्षाने अनेक विद्यमान उमेदवारांना तिकीट नाकारले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. काहींनी भाजपाकडून उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी दुसर्‍या पक्षात उडी मारत उमेदवारी पटकावली.
भाजपाने तब्बल एक हजार 70 जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. शिंदे गटाबरोबर युती करण्याच्या
चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, वाढत्या इच्छुकांमुळे अखेर भाजपाला स्वबळाचा नारा द्यावा लागला. 122 जागांवर भाजपाने उमेदवार उभे केले आहेत. एबी फॉर्म देताना भाजपाच्या अक्षरश: नाकीनऊ आले होते. एबी फॉर्मच्या गाडीचा पाठलाग करण्यापर्यंत कार्यकर्त्यांना पळापळ करावी लागली.
पंचवटीतील राहुल धोत्रे या युवकाच्या खून प्रकरणात कारागृहात असलेले उद्धव निमसे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा रिद्धिश याला पक्षाने उमेदवारी दिली. गोळीबार प्रकरणात तुरुंगात असलेल्या जगदीश पाटील यांच्या घरातील कुणालाच उमेदवारी न दिल्याने एकाला एक न्याय आणि दुसर्‍याला भलताच न्याय पाहावयास मिळाल्याने कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला होता. या सर्व्हेत ज्यांना रेड सिग्नल मिळाला, अशा मंडळींच्या उमेदवारीचा पत्ता कट करण्यात येऊन तेथे नव्यांना संधी देण्यात आली. विद्ममान नगरसेवकांपैकी अनेक जण पक्षात निष्क्रिय ठरले होते.
गेल्या पाच वर्षांत त्यांना प्रभावी काम तर करता आले नाहीच. पण पक्षाचे कामही ते फारसे करीत नव्हते. सातपूरच्या प्रभाग दहामधील शशिकांत जाधव गेल्या काही वर्षांत फारसे सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट करून तेथे समाधान देवरे यांना भाजपाने उमेदवारी दिली. त्यांच्यासोबत मागील पंचवार्षिकला निवडून आलेल्या पल्लवी पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

उमेदवारीचा पत्ता कट झालेले नगरसेवक

अनिता सातभाई, मीरा हांडगे, अंबादास पगारे, शीतल माळोदे, शशिकांत जाधव, जगदीश पाटील, पूनम सोनवणे, पंडितराव आवारे (शिवसेना शिंदे गटात प्रवेश), सतीश सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज), शाहीन मिर्झा, रूची कुंभारकर, कमलेश बोडके, प्रा. वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे (यांच्याऐवजी पत्नीला उमेदवारी), पुंडलिकराव खोडे, सुनीता पिंगळे.

BJP showed the way home to more than a dozen corporators

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *