आ. सीमा हिरे-कैलास आहिरेंमध्ये तू तू मैं मैं

प्रभाग 26 ’क’मध्ये दोन उमेदवारांना एबी फॉर्म

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आदर्श आचारसंहिता लागू असतानाही दुपारी तीन वाजल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रवेशास बंदी असतानाही आमदार सीमा हिरे यांनी कार्यालयात प्रवेश केल्याने सिडको परिसरात चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीचे कामकाज सुरू असतानाच आमदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांच्याशी संवाद साधल्यामुळे आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप केला जात आहे.
या संपूर्ण घटनेदरम्यान पोलिसांकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नसल्याचे दिसले. मात्र, भाजपाचे पदाधिकारी कैलास आहिरे यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. आमदार असल्या तरी नियम सर्वांसाठी समान असून, निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयात जाऊन दबाव टाकणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातच आमदार सीमा हिरे आणि कैलास आहिरे यांच्यात जोरदार तू तू मैं मैं करत जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी महेश जमदाडे यांनी कामकाज थांबवून आमदारांना कार्यालयाबाहेर जाण्याची विनंती केली. मात्र, दुपारी साडेचार वाजेपर्यंत आमदार कार्यालय परिसरातच थांबल्या असल्याने कर्मचार्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.
दरम्यान, प्रभाग क्रमांक 26 मधील ‘क’ गटातून अलका आहिरे यांनी उमेदवारी अर्ज व एबी फॉर्म दाखल केला असताना, त्याच गटातून पुष्पावती यशवंत पवार यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने एकाच गटासाठी दोन अधिकृत एबी फॉर्म कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुष्पावती पवार यांचा एबी फॉर्म कायम ठेवून अलका अहिरे यांचा अर्ज बाद करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप कैलास आहिरे यांनी केला आहे. निवडणूक प्रक्रियेत लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची चर्चा आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत की नाही, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

come Tu Tu Main Main in Seema Hire-Kailas Ahiren

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *