सिडकोत माजी नगरसेविका पतीला पोलिसांनी दोन तास ठेवले बसवून

तणावाचे वातावरण; आ. हिरेंच्या हस्तक्षेपानंतर सुटका

वेळ संपत असल्याने उमेदवार आणि कार्यकर्त्यांना ऐनवेळी धावपळ करावी लागली.

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे पती राकेश ढोमसे यांना अंबड पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अंबड पोलीस ठाण्यात जमा झाले होते. अखेर आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर राकेश ढोमसे यांची सुटका करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिडको विभागीय कार्यालयात आल्या होत्या. पक्षाचा एबी फॉर्म जमा करून त्या कार्यालयातून बाहेर पडत असताना अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी राकेश ढोमसे यांना थांबण्यास सांगितले. काही मिनिटांतच डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन अंबड पोलीस ठाण्यात नेले.
आपण कोणताही गुन्हा अथवा कायद्याचे उल्लंघन केले नसताना पोलीस ठाण्यात का आणले, असा प्रश्न ढोमसे यांनी पोलिसांना विचारला असता वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याचे उत्तर देण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच राकेश ढोमसे यांनी आमदार सीमा हिरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आमदार हिरे तातडीने अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. राकेश ढोमसे यांच्यावर कोणताही गुन्हा नसल्याने त्यांची सुटका करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी पोलीस अधिकार्‍यांकडे केली. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार ताब्यात घेतल्याचे सांगत त्यांना सोडता येणार नसल्याचे निरीक्षक राजपूत यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार सीमा हिरे आणि पोलीस निरीक्षक राजपूत यांच्यात शाब्दिक वाद झाला. सुमारे दोन तास हा तणावपूर्ण प्रकार सुरू होता. अखेर आमदार हिरे यांनी थेट पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर राकेश ढोमसे यांना सोडून देण्यात आले. या घटनेमुळे सिडको परिसरात विविध चर्चा सुरू असून, पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशीची शिक्षा

भाजपाचे पदाधिकारी राकेश ढोमसे यांचा कोणताही गुन्हा नसतानाही पोलिसांनी विनाकारणच ताब्यात घेतले असून, चोर सोडून संन्याशाला फाशी, या म्हणीप्रमाणे आजचा प्रकार घडला असून, जे काही झाले ते अतिशय चुकीचे झाल्याची चर्चा सिडको परिसरात सुरू होती.

 

Police kept husband of former corporator in CIDCO for two hours

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *