नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुका तब्बल आठ वर्षांनी होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रत्येकाला उमेदवारी हवी असून, जिंकून यायचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून निवडणूक होईल या आशेने मागील पंचवार्षिकमधील विद्यमान नगरसेवक आणि नव्याने निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात आली. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी स्वपक्षीयांसह विरोधी पक्षांतील अनेकांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून भाजप प्रवेशाची भरती आली. ती निवडणुका जाहीर झाल्यांनतरही कायम राहिल्याने पक्षातील निष्ठावानांवर अन्याय झाल्याचे चित्र आहे.
गेल्या आठवड्यात विनायक पांडे आणि शाहू खैरे यांचा प्रवेश निष्ठावानांच्या विरोधामुळे पोलीस बंदोबस्तात झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीही एबी फॉर्म मिळावा यासाठी प्रचंड राडा झाला. एबी फॉर्म मिळावा यासाठी दोन आमदारांसह शहराध्यक्षांच्या वाहनांचा पाठलाग करण्यात आला. इतकेच नाही तर फार्महाउसचे गेटदेखील तोडण्यात आले. हा सगळा प्रकार घडला पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
शेवटच्या दिवशी इच्छुकांनी एबी फॉर्म मिळावा यासाठी चांगलीच धावपळ केल्याचे चित्र आहे. मात्र, आयारामांना संधी आणि निष्ठावानांची कोंडी झाल्याचे चित्र असल्याने भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
भाजपप्रमाणे इतर पक्षांतही आयाराम विरुद्ध निष्ठावान, असा वाद रंगताना दिसतो आहे. मात्र, भाजपकडून इच्छुक जास्त असल्याने असंतोषही मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याचे चित्र आहे.
बंडखोरी, अंतर्गत शह-काटशह
उमेदवारी न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाल्याने बंडखोरी अधिक होण्याची शक्यता आहे. अंतर्गत शह-काटशहाचे राजकारण रंगणार असून, त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Loyalists’ outcry for candidacy