सासू नको म्हणून वाटणी केली अन् वाटणीत सासूच आली

निष्ठावंतांविरुद्ध अन्य पक्षांतील आयारामांमध्ये संघर्ष

निफाड : तालुका प्रतिनिधी
कोणत्याही पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांची खरी निवडणूक म्हणजे नगरपंचायत, नगरपालिका, महापालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका असतात. सध्याच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्ष विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष उरलेला नाही; उलट सत्ताधारी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते विरुद्ध इतर पक्षांतून आयात झालेल्या आयाराम असा संघर्ष दिसतो आहे.
साहजिकच ज्यांनी पक्षात प्रवेश केला, त्यांचा उदो उदो होताना दिसत असून, त्यांना विनासायास उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक असल्याने आता ज्यांनी पक्ष वाढविला त्यांच्या नशिबी पुन्हा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे.
आजपर्यंत ज्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी पक्ष उभा करण्यासाठी नको ते कष्टांचे ओझे अंगावर घेतले, इतर पक्षांतील नेते, कार्यकर्ते यांच्याशी पंगा घेतला, त्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीत त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळेल अशी भोळी अपेक्षा होती. मात्र, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांतील आयाराम, भांडवलदार आणि नातेवाईक यांचीच स्पर्धा लागलेली दिसते आहे. म्हणजेच सत्तेच्या वाटणीत पुन्हा सामान्य कार्यकर्त्यांना सतरंज्याच! त्यामुळे यापुढे पक्षाचे काम करायचे की नाही, अशा विचाराप्रत कार्यकर्ते आले आहेत.
कारण जेव्हा स्थानिक निवडणुका लढवण्याची वेळ येते, तेव्हा पक्ष आपल्या कामाची दखल घेत उमेदवारी देईल, अशी भोळी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. मात्र, आता ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्यांसाठी पायघड्या घातल्या जात असून, त्यांनाच तिकीट दिले जाईल, असे आश्वासन पक्ष प्रवेशावेळी दिले गेल्याने आता जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी काय कायमच सतरंज्या उचलायच्या का, असा प्रश्न विचारला जात आहे. पक्षनेतृत्वाच्या अशा वृत्तीमुळे भविष्यात अनेक पक्षांकडे कार्यकर्तेच उरणार नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी निष्ठा तरी कुणाप्रति ठेवावी, कारण जो तो नेता
स्वतःचे नातेवाईक, कुटुंबातील घटक पक्ष यांनाच तिकीट मिळावे, यासाठी नेते प्रयत्नशील असल्याचे दिसतात. त्यामुळे ज्या नेत्यांसाठी रात्रीचा दिवस केला, त्यांनी सांगितलेले काम इनाम इतबारे केले. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवली. मात्र, आता आपली वेळ येताच इतरांना जर तिकीट मिळत असेल तर आपण काय कायमच सतरंज्या उचलायच्या का? असा विचार कार्यकर्ते करू लागले आहेत.आपल्याकडे एक म्हण आहे, सासू नको म्हणून वाटणी केली अन् वाटणीत सासूच वाट्याला आली, असा काहीसा प्रकार कार्यकर्त्यांच्या बाबत होत
आहे.

I didn’t want my mother-in-law to share, but my mother-in-law came to share.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *