एमआयडीसी सिन्नर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकर्यांच्या शेळ्या व बोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. रात्री-अपरात्री गोठ्यातून जनावरं गायब होत असल्याने शेतकरी वैतागले होते. अखेर एमआयडीसी सिन्नर पोलिसांनी ही चोरट्यांची टोळी शोधून काढत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून मोटारसायकलींसह सुमारे 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कृष्णा साळूबा ढेपले (25, रा. हिवरगाव, ता. सिन्नर) व अमोल रावसाहेब जाधव (25, रा. चाटोरी, ता. निफाड, सध्या रा. पिंपळगाव निपाणी) अशी आहेत. या दोघांनी सिन्नर परिसरातील अनेक ठिकाणांहून शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली दिली आहे.
एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कामाला लागले. चोरलेली जनावरे विकण्यासाठी आरोपी देवळा येथे नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवळा येथे जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. व्यापार्यांकडे चौकशी केली आणि अखेर टोळीचा माग काढला.
हिवरगाव परिसरातून दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच चोरीचे प्रकार उघड झाले. या कारवाईमुळे परिसरातील शेतकर्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
होत आहे.
ही कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
करण्यात आली.
तपास पथकात पोलीस हवालदार प्रशांत वाघ, विनोद इपर, अमोल गुंजाळ, स्वप्निल पवार, नितीन काकड यांचा सहभाग होता. पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वाघ करत आहेत.