अखेर दोन बिबटे जेरबंद
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. शेतात काम करताना रात्रीच्या वेळी बाहेर पडताना लोक धास्तावले होते. अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात कहांडळवाडी व ब्राह्मणवाडे येथे दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने गावकर्यांनी सुटकेचा
निःश्वास सोडला आहे.
कहांडळवाडी येथे शोभा भाऊसाहेब गुंजाळ यांच्या शेतात यापूर्वी 18 डिसेंबर रोजी एक बिबट्या जेरबंद झाला होता. मात्र, याच शेतात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे लक्षात आल्याने वनविभागाने पुन्हा पिंजरा लावला. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या पिंजर्यात मादी बिबट्या अडकला. अवघ्या बारा दिवसांत एकाच शेतात दोन बिबटे जेरबंद झाल्याने संपूर्ण गावात हीच चर्चा सुरू होती. सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने बिबट्याला सुरक्षितपणे मोहदरी वनोद्यानात हलविले.
दरम्यान, ब्राह्मणवाडे गावातही बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी घाबरून गेले होते. बापू पंढरीनाथ गिते यांच्या सामाईक मालकीच्या गट नंबर 54 मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात शुक्रवारी दुसरा बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या पिंजर्यात अडकल्याचे समजताच ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानत समाधान व्यक्त केले. या कारवाईत उपवनसंरक्षक सिद्धेश्वर सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघोरे व सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल, वनरक्षक व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. जेरबंद बिबट्याला सिन्नरच्या मोहदरी वनोद्यानात सुरक्षितरीत्या हलविण्यात आले आहे.