राज ठाकरे 20 वर्षांनी शिवसेना भवनात
मुंबई :
महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी ठाकरे बंधूंनी ‘शब्द ठाकरेंचा’ हा वचननामा प्रसिद्ध केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेना भवनात संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनसे आणि शिवसेनेचा (उबाठा गट)हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा पाऊल ठेवले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करुन केली. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाल्यासारखे वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. भाजपचे राहुल
नार्वेकर हे आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात. त्यांचा अधिकार विधानसभेत आहे, बाहेर ते एक आमदार आहेत. ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात. हे विधानसभा अध्यक्षपदाच्या प्रतिमेला छेद देणारे वक्तव्य आहे.ते नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे समोरच्याचे संरक्षण काढून घ्यायला सांगतात. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. आम्ही 25 वर्षांत मुंबईत फार साधी-साधी कामं केली आहेत. साधं कोस्टल रोडचं काम केलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलं आहे, कोरोनात लहानसहान कामं केली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी कामं केली, मोदींनी कैलास पर्वत बांधला आहे. स्वर्गातून गंगा त्यांनी आणली आहे. मिंध्यांनी अरबी समुद्र तयार केला आहे, ही त्यांची काम मागत पडत आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली. मुंबईच्या रिगल चौकात शिवसेनाप्रमुखांचा पुतळ्याची जागा आम्ही निवडली, तो पुतळा माझ्या देखरेखीत तयार झाला, त्याचे श्रेयही मिंधे घेत आहेत. त्याऐवजी अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांनी तयार केला, अरबी समुद्रात मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन तयार केले होते. ते पाण्यातील शिवस्मारक बाहेर कधी काढणार? समुद्र मंथनही मोदींनी केले होतं, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या वक्तव्याने शिवसेना भवनात हशा पिकला
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी, राज ठाकरे हे 20 वर्षांनी शिवसेना भवनात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. यावर राज ठाकरे यांनी मिश्कील टिप्पणी केली. संजय राऊत यांनी मी 20 वर्षांनी आल्याचा उल्लेख केला. ते ऐकून मला वाटत होतं की, मी 20 वर्षांनी सुटून आलोय, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
जाहीरनाम्यातील महत्त्वाचे 10 मुद्दे…
मोफत वीज, ’बेस्ट’च्या घरगुती ग्राहकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला जाईल. पालिका कर्मचार्यांपासून मिल कामगारांपर्यंत सर्वांना हक्काची घरे दिली जातील. पुढील 5 वर्षांत 1 लाख मुंबईकरांना स्वस्त घरे उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. घरकाम करणार्या महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत दिली जाईल. तसेच महिलांसाठी दर 2 किमीवर सुसज्ज स्वच्छतागृहे आणि ’मासाहेब किचन’मधून 10 रुपयांत जेवण मिळेल, नवीन मेडिकल कॉलेज आणि स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभारले जाईल. जेनेरिक औषधे पालिकेच्या रुग्णालयात मोफत मिळतील. बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट केल्या जातील आणि महिला-विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जाईल., 1 लाख तरुणांना स्वरोजगारासाठी 1 लाखापर्यंत अर्थसाहाय्य आणि गिग वर्कर्सना ई-बाईकसाठी व्याजमुक्त कर्ज मिळेल. पालिका शाळांमध्ये 12 वी पर्यंतचे शिक्षण दिले जाईल आणि ’बोलतो मराठी’ उपक्रमातून मराठी भाषेचा प्रसार केला जाईल. रेसकोर्स, आरे जंगल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची जमीन कोणत्याही बिल्डरला दिली जाणार नाही. पाळीव प्राण्यांसाठी स्वतंत्र पार्क, अॅम्बुलन्स आणि स्मशानभूमीची सोय केली जाईल. मुंबईत होणार्या संगीत कार्यक्रम, आयपीएल सामन्यांमध्ये 18 ते 21 वयोगटातील तरुणांसाठी 1% तिकिटे मोफत राखीव
असतील.
Shivshakti’s promise announced