पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, सून, नातू, पुतण्या, सासू, जावई रिंगणात
मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली असून, या यादीतून एक महत्त्वाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. शहरातील जवळपास सर्वच प्रमुख पक्षांनी उमेदवार निवडताना कुटुंबातील सदस्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
अपवादवगळता बहुतेक पक्षांमध्ये घराणेशाहीचाच प्रभाव असून, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, सून, नातू, पुतण्या, सासू, जावई अशा नातलगांना उमेदवारी दिली आहे. मालेगाव महापालिकेची निवडणूकही या प्रवाहाला अपवाद ठरलेली नाही.
काँग्रेस पक्षाने शहराच्या पूर्व भागात एकूण 20 उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. यामध्ये पक्षाच्या शहराध्यक्ष एजाज बेग यांच्यासह त्यांच्या पत्नी यास्मीन बेग आणि भाऊ रियाज बेग यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख स्वतः निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये मनपाच्या दोनवेळच्या माजी महापौर ताहेरा शेख रशीद तसेच माजी आमदार शेख यांचे बंधू इमरान शेख यांचा समावेश आहे. पक्षाच्या निर्णयामुळे घराणेशाहीचा मुद्दा येथेही चर्चेचा विषय ठरला आहे.
समाजवादी पार्टीनेही घरातीलच उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. माजी आमदार पै. निहाल अहमद यांची कन्या माजी नगरसेविका शान-ए-हिंद तसेच त्यांचे पती मुस्तकीन डिग्निटी या दोघांना समाजवादी पार्टीतर्फे निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच पती-पत्नीच्या नेतृत्वाखाली समाजवादी पार्टीची महापालिका निवडणूक लढविली जात आहे.
उद्धवसेनेतर्फे कैलास तिसगेंच्या पत्नीला उमेदवारी
उद्धवसेनेने एकूण 11 उमेदवारांना निवडणुकीत उतरविले आहे. यामध्ये प्रभाग 9 मधून कैलास तिसगे आणि त्यांच्या पत्नी कोकिळा तिसगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कैलास तिसगे हे प्रभाग 9 मधील ‘ड’ जागेवर, तर त्यांच्या पत्नी कोकिळा तिसगे या ‘ब’ जागेवर उद्धवसेनेतर्फे निवडणूक लढवत आहेत.
भाजपात एकाच कुटुंबात तिघे
भाजपने पश्चिम भागातील 5 प्रभागांतून एकूण 20 उमेदवार जाहीर केले आहेत. माजी गटनेते सुनील गायकवाड यांच्या कुटुंबातील तिघांचा या यादीत समावेश आहे. सुनील गायकवाड हे स्वतः प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवत असून, त्यांचे लहान बंधू माजी नगरसेवक मदन गायकवाड प्रभाग क्रमांक 12 मधून, तर सुनील गायकवाड यांचे पुत्र दीपक गायकवाड हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर
एकूणच मालेगाव महापालिका निवडणुकीत सर्वच प्रमुख पक्षांनी घरातीलच उमेदवारांना संधी दिल्याने घराणेशाहीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निष्ठावंत आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलून घरातच उमेदवारीचे वाटप केल्यामुळे अनेक पक्षांना अंतर्गत नाराजीचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. आगामी निवडणुकीत मतदार या घराणेशाहीवर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिंदेसेनेतर्फे पत्नी, जावई
शिंदेसेनेने मनपा निवडणुकीसाठी 6 प्रभागांतून 24 उमेदवार उभे केले आहेत. माजी विरोधी पक्षनेते (कै.) दिलीप पवार यांच्या पत्नी माजी नगरसेविका जिजाबाई पवार यांना प्रभाग क्रमांक 1 मधून, तर त्यांचे पुत्र विशाल पवार यांना प्रभाग 10 मधून उमेदवारी दिली आहे. तसेच माजी उपमहापौर सखाराम घोडके यांच्या पत्नी लताबाई घोडके यांना प्रभाग 9 मधून, तर त्यांचे जावई विनोद वाघ यांना प्रभाग 12 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
Influence of dynasty in Malegaon Municipal Corporation elections