तपोवन वृक्षतोड आंदोलनामागे छुपा अजेंडा

अक्षय गुंजाळ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अधिवेशन

नाशिक : प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 60 वे हीरकमहोत्सवी पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन सध्या नाशिक येथे उत्साहात सुरू असून, काल अधिवेशनाचा दुसरा दिवस विविध उपक्रमांनी गाजला. यानिमित्त भव्य शोभायात्रा व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहरात दाखल झालेल्या हजारो विद्यार्थी कार्यकर्त्यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
शोभायात्रेनंतर मॅरेथॉन चौक येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना ‘अभाविप’चे नाशिक नगर मंत्री अक्षय गुंजाळ यांनी नाशिक तपोवन येथील वृक्षतोडीविरोधी आंदोलनावर कडाडून टीका केली. “आंदोलकांनी छुपा अजेंडा चालवू नये. या आंदोलनामागे साधू-संत आणि हिंदू धर्मविरोधी कट-कारस्थान असल्याचा संशय निर्माण होत आहे. अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सरकार व प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
यापूर्वी गंगापूर रोड येथील डोंगरे वसतिगृह मैदानापासून सुरू झालेल्या शोभायात्रेला नाशिककरांचा मोठा प्रतिसाद लाभला. ‘अभाविप’चे पूर्व कार्यकर्ते, जनकल्याण रक्तपेढी, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रविवार कारंजा, शालिमार परिसरातील व्यापारी, उद्योजक यांच्या वतीने विविध ठिकाणी पुष्पहार, फुलांची उधळण व घोषणांनी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
ही शोभायात्रा मॅरेथॉन चौक, अशोक स्तंभ, आर.के., रेड क्रॉस सिग्नल, शालिमार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सीबीएस, राजीव गांधी भवन, पंडित कॉलनी असा मार्गक्रमण करत पुन्हा मॅरेथॉन चौक येथे पोहोचली.
शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, बापू वीरू, खंडोबा-बाणू, हंबीरराव मोहिते, यशवंतराव चव्हाण आदी ऐतिहासिक व सामाजिक व्यक्तिमत्त्वांचे त्या त्या काळातील वेशभूषेत साकारलेले सजीव देखावे आकर्षणाचे केंद्र ठरले. या देखाव्यांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, सांस्कृतिक वारसा व सामाजिक जाणीव अधोरेखित करण्यात आली.
जाहीर सभेत ‘अभाविप’च्या विविध छात्र नेत्यांनी बांगलादेशी घुसखोरीसह राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, सामाजिक बांधिलकी, बिरसा मुंडा यांच्या थोर कार्यावर प्रकाश टाकत पर्यावरण, कुंभमेळा व इतर समकालीन विषयांवर ठाम भूमिका मांडली.
या सभेला ‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, प्रदेशाध्यक्ष शांतिनाथ बागेवाडी, प्रदेश मंत्री आदित्य मुस्के, प्रदेश सहमंत्री श्रावणी यांच्यासह छात्र नेते अक्षय गुंजाळ, शिवतेज शेते, निकिता डिंबर, ओम इंगळे आदी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवसाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

Hidden agenda behind Tapovan tree cutting movement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *