पक्षीय उमेदवारांची पंचाईत; बंडखोरी रोखण्यात अपयश
इंदिरानगर : वार्ताहर
महापालिका निवडणुकीत ऐनवेळी तिकिटाची कापाकापी झाल्याने अनेकांनी पक्षाविरुद्ध बंड पुकारले आहे. हे बंड शांत करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यंदाच्या निवडणुकीत अनेकांची उमेदवारी नाकारण्यात आली. यामुळे इच्छुकांची चांगलीच हिरमोड झाली. ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या आयारामांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली. त्यामुळे अनेक जण अपक्ष उमेदवारी करत आहेत. प्रभाग क्रमांक 30 मध्ये दहा, तर प्रभाग क्रमांक 31 मध्ये दहा, असे दोन्ही प्रभाग मिळून वीस जणांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पाथर्डी भाजपा मंडलाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे संघटन उभे करणारे जितेंद्र चोरडिया यांना भाजपाने तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. अठरा वर्षे भाजपाशी एकनिष्ठ राहिलेले संजय गायकवाड यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळाले नाही. त्यांनीदेखील अपक्ष फलंदाजी करण्याचे ठरवले. पाथर्डी भागात घराघरांत भाजप पोहोचवणारे, प्रत्येक निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना मदत करणारे एकनाथ नवले यांनादेखील तिकीट नाकारल्याने त्यांच्या पत्नी सोनाली एकनाथ नवले हेदेखील अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दोन वेळा नगरसेवक झालेले सतीश सोनवणे यांनी मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवार म्हणून भूमिका घेत पूर्ण पॅनल निवडून आणले होते. त्यांना पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्ज दाखल करत ’घड्याळ’ हातात घेतले. शिवा तेलंग यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून अनेक समाजसेवी काम प्रभागात केले होते. एकाच जागेसाठी दोन एबी फॉर्म दिल्याने तेलंग यांचा एबी फॉर्म ग्राह्य न धरल्याने पूजा शिवा तेलंग अपक्ष लढत आहेत. अनिल गायकवाड यांच्या एबी फॉर्मबाबतदेखील गोधळ झाल्याने तेदेखील अपक्ष लढत आहेत. याशिवाय प्रगती चेतन फेगडे, धीरज बच्छाव, शरद जाधव हेही अपक्ष उमेदवारी करत आहेत. अपक्षांची संख्या वाढल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एका मोठ्या पक्षाच्या अध्यक्षांची नाशकात सभा असताना त्यांनी फोनद्वारे पक्षाच्या अपक्ष उमेदवारांशी संपर्क करून बंड शमविण्यासाठी प्रयत्न केले. काही वरिष्ठांनी अपक्षांचे थेट घर गाठत मन वळविण्याचा प्रयत्न केला. पक्षाने कमजोर समजून तिकीट कापल्याने आता आमची ताकद दाखवणार असल्याचे अपक्षांनी सांगितले व प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
Independents add to the headache in Wards 30 and 31