गणपती मंदिरांत भाविकांची रीघ

अंगारक चतुर्थीचा साधला योग

नाशिक : प्रतिनिधी
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नाशिक शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्ताने शहर व परिसरातील विविध गणपती मंदिरांत भाविकांनी पहाटेपासूनच गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. सकाळपासून अनेक मंदिरांत बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दूर्वा, नारळ, फुले तसेच पेढे आदी नैवेद्य अर्पण करून भाविकांनी गणेशचरणी प्रार्थना केली.
अंगारिकेनिमित्त शहरातील गणेश मंदिरांत महाभिषेक, अर्थवशीर्ष पठण, गणेशयाग यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात बाराहून अधिक प्रसिद्ध गणपती मंदिरे असून, ढोल्या गणपती, चांदीचा गणपती, नवश्या गणपती या मंदिरांत भाविकांची विशेष गर्दी दिसली.
रविवार कारंजावरील गणपती मंदिरात दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ होती. सायंकाळच्या आरतीसाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असल्याने येथे भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. नवश्या गणपती मंदिरात नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नाशिकरोड येथील इच्छामणी गणेश मंदिरातही भाविकांनी हजेरी लावून गणरायाचे दर्शन घेतले.
शहरातील विविध भागांतील गणपती मंदिरांत दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी साबूदाणा खिचडी, केळी, राजगिरा लाडू आदींचे वाटप करण्यात आले. अंगारक संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने शहरात भक्ती, श्रद्धा व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

उमेदवारांनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

शहरात महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू असून, अंगारक संकष्ट चतुर्थीचा योग आल्याने अनेक उमेदवारांनी प्रचाराचा शुभारंभ करण्यापूर्वी गणरायाचे दर्शन घेऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला. गणपती बाप्पाच्या चरणी विजयासाठी प्रार्थना करत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र शहरातील विविध मंदिरांत पाहायला मिळाले.

Devotees throng the Ganapati temple

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *