वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा पिकास पोषक
निफाड ः तालुका प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसांत थंडीचे प्रमाण कमी होऊन तापमानाचा पारा 13 अंशांवर स्थिरावत असताना अचानक तापमानात मोठी घट होत गुरुवारी तापमान 7 अंशांवर आल्याने अवघा तालुक्याला हुडहुडी भरली आहे.
यंदा निफाडची वाटचाल महाबळेश्वरच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. तापमानाचा पारा 4 अंशांवर आला होता. आता मागील आठवड्यापासून तापमानात थोड्याफार प्रमाणात चढ-उतार होताना दिसत आहे. बुधवारी निफाड कृषी संशोधन केंद्रावर 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असतानाच, गुरुवारी तापमानात मोठी घट होत तापमानाचा पारा 7 अंशांवर आला. गेल्या महिन्यापासून उत्तरेकडून वारे वाहत असल्याने थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचा माहोल कायम राहील, असा अंदाज आहे. वाढती थंडी गहू, हरभरा, कांदा पिकासाठी पोषक ठरत असली तरी, पिकांवर बुरशीजन्य तसेच रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थंडीपासून द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी बागेत चिपाटे पसरवून ठेवू लागले आहेत. थंडीमुळे द्राक्षवेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. थंडीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अधिक अडचणीत येण्याची परिस्थिती तयार होत आहे.
Niphadkar gets chilly; mercury at 7 degrees