यंदा उशिरा द्राक्ष हंगामाला सुरुवात; परतीच्या पावसामुळे 70 टक्के नुकसान

निफाड : आनंदा जाधव
दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणारा द्राक्ष हंगाम यंदा तब्बल दीड महिने उशिरा आणि धीम्या गतीने सुरू होत आहे. हंगामाच्या प्रारंभी द्राक्षाला 201 रुपये प्रतिकिलोने भाव मिळाला आहे. यंदा दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाल्याने तालुक्यात जवळपास 70 टक्के द्राक्षबागांना फळधारणा झाली नसल्याने त्याचा थेट परिणाम बाजारभाव वाढण्यावर झाला. द्राक्ष पिकासाठी झालेला खर्च आणि अल्प उत्पादन यामुळे यंदा द्राक्षपीक तोट्याचे ठरण्याची अधिक शक्यता आहे.
द्राक्षपंढरी म्हणून निफाड तालुक्याची ओळख आहे.. वेगवेगळ्या जातीची निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्याची येथून शेतकर्याची खासियत आहे. मात्र, यंदा निसर्गाने त्यावर अक्षरश: पाणी फिरविले. वर्षातून एकदाच येणार्या या पिकासाठी शेतकरी मेहनत घेतो. मात्र, यंदा परतीचा दीर्घकाळ लांबलेल्या पावसामुळे बागेत औषध फवारणीस अडचणी आल्या. बागेत पावसाचे पाणी साचून राहिल्याने द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊन वेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता कमी झाली. प्रतिकूल हवामानाचीदेखील त्यात भर पडली.
तालुक्यात थॉमसन, शरद सीडलेस, अनुष्का, एसएसएन या द्राक्ष वाणांची सर्वाधिक लागवड झालेली असून, त्यांना भावदेखील चांगला मिळतो. हंगामाच्या प्रारंभी व्यापारीवर्ग साधारण 150 ते 200 रुपये प्रतिकिलोप्रमाणे द्राक्ष खरेदी करतात. द्राक्षमालाची आवक आणि टंचाई यावर बाजारभावाचे गणित अवलंबून असते.
यंदा अतिपावसामुळे 70 टक्के द्राक्षबागांना फलधारणा न झाल्याने यापैकी अनेक शेतकर्यांनी द्राक्षबागा तोडल्या. त्यामुळे यावर्षी बेदाणा, मनुके, द्राक्षमणीदेखील भाव खातील, असा अंदाज आहे. जमतेम द्राक्षमालामुळे यंदा द्राक्षाला सुरुवातीला मिळणारा बाजारभाव शेवटपर्यंत राहील किंवा या बाजारभावात वाढ होईल, असाच अंदाज आहे.
साहजिकच आजचा बाजारभाव जास्त वाटत असला तरी त्या तुलनेत फळधारणा झालेली नसल्याने जमा-खर्चाची तोडमिळवणी करताना शेतकर्यांच्या नाकीनऊ येणार हे मात्र निश्चित. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने शेती व्यवसायाला प्राधान्य देत, ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
शरद सीडलेस जातीची बाग असून, दरवर्षी मी ऑगस्ट महिन्यात द्राक्षबागेची छाटणी करीत असतो. यंदा अतिपावसामुळे 1 सप्टेंबरला छाटणी केली. आता आठ दिवसांपासून मोहाडी येथील गुरुकृपा एक्स्पोर्टला 190 रुपये किलोप्रमाणे द्राक्ष दिली. प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षबाग वाचविल्याने यंदा चांगले उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे. यानंतर दुसरा प्लॉटदेखील सुरू करणार आहे.
– विजय डांगले, प्रगतिशील शेतकरी, नांदूरमध्यमेश्वर
Due to adverse conditions, the price of grapes is Rs 200 per kg.