चार हजार सहाशे बॅलेट मशिनची व्यवस्था
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी 1600 टीम तयार करण्यात आल्या असून, त्यांना दोन सत्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. महापालिका निवडणुकांसाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली असून, मतदानासाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले आहे. रविवारी साडेसहा हजार कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अर्ज छाननी व माघारीची धामधूम संपताच मतदानासाठीची तयारी सुरू झाली आहे. दादासाहेब गायकवाड सभागृह, कालिदास कलामंदिर व संभाजी स्टेडियम येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच केंद्राध्यक्ष सहाय्यक केंद्राध्यक्षांना स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाणार आहे. 10 व 12 जानेवारीला दुसर्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जाणार आहे. मतदानासाठी महापालिकेला 1620 कंट्रोल युनिट, 4657 बॅलेट युनिट व 1595 मेमरी कार्ड प्राप्त झाले आहेत. उमेदवारांची संख्या पाहून अजून बॅलेट युनिट मागवले जाणार आहेत. महापालिकेसाठी नियुक्त केलेले मुख्य निरीक्षक दीपक कपूर यांनी शनिवारी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. कपूर यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासोबतच शनिवारी सहा विभागीय कार्यालयांना भेटी देऊन अर्ज छाननी प्रक्रियेची पाहणी केली. तसेच, आयुक्तांच्या उपस्थितीत अधिकार्यांची बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक प्रक्रिया पारदर्शी पार पाडण्यासह आचारसंहितेच्या तक्रारी तत्काळ सोडवण्याचे निर्देश दिले. राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता कक्ष 24 तास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेनेही पालिकेतील आचारसंहिता कक्ष 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारीसाठी 2317606 हा स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर नागरिक थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकतात.
Administration makes vigorous preparations for the voting process