नागरिकांनी लाभ घ्यावा; ओमकार पवार यांचे आवाहन
नाशिक : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा सुलभ, पारदर्शक व वेळेत मिळाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या एकूण 7 महत्त्वाच्या सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, शासनाच्या डिजिटल महाराष्ट्र संकल्पनेनुसार नागरिक-केंद्रित सेवा अधिक सुलभ करण्यासाठी जिल्हा परिषद नाशिक सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील या सेवांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार फेर्या मारण्याची आवश्यकता राहणार नाही. नागरिक घरबसल्या ऑनलाइन अर्ज सादर करू शकतील, अर्जाची स्थिती तपासू शकतील तसेच आवश्यक दाखले वेळेत प्राप्त करू शकतील.
या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचणार असून, सेवा वितरण प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता व विश्वासार्हता वाढणार आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून, प्रशासकीय कामकाजात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.
या सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध असल्याने नागरिकांना अर्जासाठी प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहण्याची गरज उरणार नाही. अर्ज सादरीकरणापासून ते दाखला मिळेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पार
पडणार आहे.
आपले सरकार पोर्टलवरील या सुविधा नागरिकांच्या सोयीसाठीच आहेत. त्यामुळे नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा.
– ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जि. प. नाशिक
‘आपले सरकार’ पोर्टलवर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत खालील 7 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत –
♦ जन्म नोंद दाखला
♦ मृत्यू नोंद दाखला
♦ विवाह नोंद दाखला
♦ दारिद्य्ररेषेखालील असल्याचा दाखला
♦ ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला
♦ नमुना 8 चा उतारा
♦ निराधार असल्याचा दाखला