शहराची बकाल अवस्था, नाशकात शिवशक्तीची विराट सभा
नाशिक : प्रतिनिधी
भाजपमध्ये निष्ठावंतांना किंमत नसून भाडोत्री लोक आणले जात आहेत. नाशिककर 2017 मध्ये भूलथापांना बळी पडले. मात्र, दत्तक शहरात ड्रग्ज, बकालपणा व भ्रष्टाचारच पोसला गेला. तपोवनातील झाडे तोडून जमीन बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, अशी जहरी टीका ठाकरे बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर येथे शुक्रवारी (दि. 9) केली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा शुक्रवारी (दि. 9) ऐतिहासिक अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर पार पडली. यावेळी उद्धव व राज यांनी खास आपल्या शैलीत भाजपचा समाचार घेतला. यावेळी खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, उपनेते दत्ता गायकवाड, खासदार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गिते, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनसेचे अंकुश पवार, सुदाम कोंबडे आदींसह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप-एमआयएम युती हे कोणते हिंदुत्व?
भाजपने पाठीत खंजीर खुपसला म्हणून आम्ही कॉँग्रेससोबत गेलो. त्यावरून आम्ही हिंदुत्व सोडल्याची टीका भाजप करतो. मात्र, हाच भाजप जेव्हा अकोटमध्ये एमआयएमशी सत्तेसाठी युती करतो, तेव्हा आम्हाला हिंदुत्व शिकवणार्या भाजपचे हे कोणते हिंदुत्व आहे, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.
अपूर्ण प्रकल्पांची वाचली यादी
दत्तक नाशिक घेताना मुख्यमंत्र्यांनी खूप घोषणा केल्या. त्यात निओे मेट्रो, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क, द्वारका उड्डाणपूल, बाह्य रिंगरोड, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे हे सर्व प्रकल्प झाले का, याची विचारणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून विचारली असता, त्यावर उपस्थितांकडून नाही, नाही असे म्हणत प्रकल्प झाले नसल्याचे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला.