आ. डॉ. राहुल आहेर : जलसमृद्धी अभियानाचा संकल्प
चांदवड : वार्ताहर
गेल्या अनेक दशकांपासून चांदवड आणि देवळा तालुक्यांच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ हा शब्द आता इतिहासजमा होणार आहे. या दोन्ही तालुक्यांचा कायापालट करण्यासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या कल्पनेतून ‘जलसमृद्धी अभियान’ हाती घेण्यात आले असून, आगामी चार वर्षांत प्रत्येक गावातील पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. चांदवड येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात आयोजित या अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार अनिल चव्हाण, गटविकास अधिकारी मच्छिंद्र सांबळे, कृउबा सभापती नितीन आहेर, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, संदीप काळे, निवृत्ती शिंदे, अशोक भोसले, डॉ. नितीन गांगुर्डे, मोहनलाल शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे,हे केवळ सरकारी फाइल्सपुरते मर्यादित न राहता थेट बांधावर पोहोचणार आहे. आमदार डॉ. आहेर यांनी सांगितले की, सिंचन विभागाच्या अधिकार्यांसोबत आम्ही स्वतः दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक गावात जाणार आहोत.
या महत्त्वाकांक्षी योजनेला शासनमान्यता मिळाली असून, सध्या त्याचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे पाणी दिंडोरीसह चांदवड आणि देवळा तालुक्यांसाठी वरदान ठरणार आहे. विशेषतः हायराइज कॅनॉलचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यास या भागातील सिंचन क्षेत्रात वाढ होईल, असा विश्वास डॉ. आहेर यांनी
व्यक्त केला.
लोकसहभागाचे आवाहन
हे अभियान यशस्वी करण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन करताना आमदार म्हणाले की, “येत्या 26 जानेवारी रोजी होणार्या ग्रामसभांमध्ये प्रत्येक गावाने आपापल्या भागातील अपेक्षित सिंचन कामांचे आणि मुख्यमंत्री शेत पाणंद रस्ते योजनेचे ठराव एकमताने मंजूर करून घ्यावेत. पाणंद रस्त्यांच्या कामांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असून, रस्त्यांचा प्रश्न सुटल्यास शेतकर्यांना आपला शेतमाल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सोपे होईल.
प्रशासकीय यंत्रणा सज्ज
प्रांताधिकारी कैलास कडलग आणि तहसीलदार अनिल चव्हाण यांनी या मोहिमेत प्रशासनाच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जलसमृद्धी अभियानामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरींना बाराही महिने पाणी उपलब्ध राहील, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. या बैठकीला तालुक्यातील सर्व सरपंच, विविध विकास संस्थांचे पदाधिकारी, ग्रामसेवक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Chandwad-Devla will erase the drought stigma