नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त तपोवन परिसरात साधू-संतांच्या पारंपरिक निवासाची तयारी सुरू असताना, गेल्या दहा-बारा वर्षांत उगवलेल्या छोट्या-मोठ्या झाडांवरून वाद निर्माण करण्यात आल्याचा आरोप कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी येथे रविवारी (दि. 11) केला. पर्यावरणप्रेमींच्या नावाखाली काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी मुद्दाम धार्मिक कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. गोदाघाटावर आयोजित सभेत ते बोलत होते.
आतापर्यंत आंध्र प्रदेशातून सात ते आठ हजार झाडे आणून लावण्यात आली आहेत. उर्वरित झाडांची लागवडही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नव्याने लावलेल्या झाडांकडे एकही तथाकथित वृक्षप्रेमी फिरकला नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. मोठी झाडे तोडणार नाही, ही ग्वाही आम्ही अनेकदा दिली आहे. तरीही मुद्दाम झाडांना चिटकून बसून धार्मिक कार्यक्रमात खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप
त्यांनी केला.
ठाकरे बंधूंनी नुकतेच आपल्याला लाकूडतोड्या म्हणत खिल्ली उडवल्याचा उल्लेख करत महाजन म्हणाले की, मी 20 हजार झाडे लावून त्यांचे संगोपन करतोय, तरीही टीआरपीसाठी आरोप केले जात आहेत. आदित्य ठाकरेंना आता जाग आली, ते झाडाला मिठी मारून गेले. राज ठाकरे काहीही बोलतात. मुख्यमंत्र्यांवरही टीका करतात. मला लाकूडतोड्या म्हणतात; बोलू द्या, ते मोठे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर बोलत असल्याची टीका होत असली, तरी फडणवीस विकासाशिवाय बोलत नाहीत. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच उरलेले नाही. त्यामुळे निवडणुका आल्या की, ते पावसाळ्यातील बेडकांसारखे आवाज करतात, अशी घणाघाती टीका महाजनांनी केली. मुंबई महापालिकेचा 25 वर्षांचा सत्ताकाळ, कोरोना काळातील कथित घोटाळे आणि निवडणूक अपयशाचा दाखला देत त्यांनी ठाकरे ब्रँडवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे असोत, राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस-मविआ एकही मोठी महापालिका जिंकू शकणार नाही. लोकांचा विश्वास भाजप महायुतीवर आहे. या महापालिकेतही तो विश्वास सार्थ ठरेल, असे त्यांनी सांगितले. नाशिकचे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व वाढत असून, शहराचा झपाट्याने विकास होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्रात नरेंद्र मोदी, राज्यात देवेंद्र फडणवीस आणि महापालिकेत भाजपाचा महापौर आल्यास विकासाची गाडी थांबणार नाही, असे सांगत महाजन म्हणाले की, नाशिक सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित करायचे आहे. गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी यांना आळा घालून कायद्याचा बालेकिल्ला उभारण्यात मोठे यश आले आहे. त्यामुळे नाशिकची प्रतिमा अधिक उजळ झाली आहे. विरोधकांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देत, विकासाच्या मुद्द्यावरच जनता निर्णय घेईल, असा दावा मंत्री महाजन यांनी यावेळी केला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत महाजन म्हणाले की, केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कुंभमेळ्यासाठी 30 हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातील सुमारे अर्धी कामे सुरू असून, उर्वरित कामे लवकरच सुरू होतील. साडेसात हजार कोटींचा बाह्य रिंगरोड, 2,200 कोटींची अंतर्गत रस्त्यांची कामे, तसेच विविध परिसरातील हजारो कोटींचे प्रकल्प मार्गी
लागत आहेत.
नाशिककरांसाठी कायम डोकेदुखी ठरलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर महाजन यांनी ठाम भूमिका मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, आता डांबरी रस्ते नाहीत. 2,200 कोटींंचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात येतील. पुढील 20 ते 25 वर्षे नाशिकमध्ये एकही खड्डा पडणार नाही असा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले.
मंत्री महाजन यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना सांगितले की, विकासकामांचा हा वेग कायम ठेवायचा असेल तर भाजपला मोठे बळ द्यावे लागेल. नाशिकचा विकास थांबवायचा नसेल तर ही मनपा निवडणूक निर्णायक ठरणार आहे.
100 प्लसची जबाबदारी कार्यकर्त्यांवर
महापालिका निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर आयोजित सभेत बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या विकासाचा विस्तृत आढावा घेत भाजपच्या 100 प्लस निर्धाराचा पुनरुच्चार केला.
महाजन म्हणाले की, वैयक्तिक दुःख असतानाही पंकजाताई मुंडे यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला, याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो. निवडणुकीला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. 16 तारखेला निकाल लागेल. आपण जाहीर केले आहे की, 122 पैकी 100 नगरसेवक निवडून आणायचे आहेत. मागील वेळी 67 नगरसेवक निवडून दिले. यावेळी ही जबाबदारी अधिक मोठी आहे.
Obstacles to Kumbh Mela in the name of environment: N. Mahajan