राष्ट्रमाता, राजमाता, माँसाहेब जिजाऊ

माहाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून त्या माउलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा.
अखंड महाराष्ट्राची राजमाता व या महाराष्ट्राच्या मातीला दोन छत्रपती स्वतःच्या कर्तृृत्वाने निर्माण करून देणार्‍या आणि लहान- लहान तुकड्यांत व जातीपातींत विखुरलेल्या समाजाला एका माळेत ओवणार्‍या, तसेच महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बांधून ते प्रत्यक्षात आणणार्‍या राजमाता जिजाऊ यांना वंदन. आऊसाहेब म्हणजे जिजाबाई यांचा जन्म 12 जानेवारी इ.स.1598 सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे म्हाळसाबाई ऊर्फ गिरिजाबाई हे होते. असे म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. भविष्य सांगितले गेले की, ही मुलगी राष्ट्राचा उद्धार करेल. मुलगी झाली म्हणून हत्तीवरून साखर वाटणारे हे कर्तबगार घराणे. लहानपणापासून जिजाऊ हुशार व धाडसी होत्या. वडिलांच्या तालमीतच त्या तलवारबाजी, दांडपट्टा चालविणे, घोड्यावर बसणे, भाला फेकणे, न्यायनिवाडा करणे, वाचन-लेखन हे शिक्षण मिळाले होते. कारण लखुजीराव नावाजलेले व कर्तबगार सेनापती म्हणून निजामशाहीत होते.
बालपण असेच गेले. त्यांचा विवाह सन 1605 मध्ये देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज असलेले मिलोजीराव भोसले यांचा मुलगा शहाजीराजांशी दौलताबाद येथे झाला. शहाजीराजे हेही निजामशाही व आदिलशाहीमध्ये नावाजलेले सरदार होते. जिजाबाई व शहाजीराजे यांना एकूण आठ अपत्ये झाली. त्यांपैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला, तर शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला.अखंड महाराष्ट्राला आनंद झाला. सनई-चौघडा, नगारे, संबळ गडावर दुमदुमले. शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
वीरकन्या, वीरपत्नी जिजाऊ
होत्या राजमाता, राष्ट्रमाता
त्यांच्या उदरी जन्मा आला
महाराष्ट्राचा भाग्यविधाता
शिवाजी राजांना सांगत अन्याय झाला तर तो सहन करायचा नाही, तर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, अशी शिकवण दिली. जिजाबाईंनी शिवाजी राजांना रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता. बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, तसेच श्रीकृष्णाच्या कथा सांगितल्या.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारामुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्याच गोष्टी सांगितल्या नाहीत, तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. युद्धतंत्र, घोड्यावर बसणे, भाला फेकणे, दांडपट्टा चालविणे, बाण मारणे, गोफण मारणे, गनिमीकावा आदी शिकवले.
शिवाजीराजे लहान असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूदर्र् केली. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई पुण्यात दाखल झाल्या. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी सरदारांच्या सोबतीने नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी बाल शिवरायांंच्या हातून शेतजमीन नांगरली. स्थानिक लोकांना अभय दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्‍यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या सहाशे तरुण सवंगड्यांना सोबत घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामुळे अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला, असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला. स्वराज्याचे पहिले तोरण बांधले. मग या माउलीने अनेक गडकोट ताब्यात घेण्यासाठी राजांना मार्गदर्शन केले. जिजाऊ जशा शिवरायांना जीव लावत व खाऊ घालत, तसेच त्यांच्या सवंगड्यालाही हाताने भरवत होत्या. जिजाऊंच्या प्रत्येक गोष्टी मावळे पाळत असत. माँसाहेबांची इच्छा म्हणून तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकून दिला.
शहाजीराजे यांचा अंत झाल्यानंतरही त्या शिवबा व शंभूराजे यांच्यासाठी व अखंड हिंदवी स्वराज्यासाठी सती गेल्या नाहीत. 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक करवून घेतला. सार्‍या भारताचे पहिले छत्रपती म्हणून शिवाजीराजांना गादीवर बसविले. त्यांनी शंभूराजे यांचीही खूप काळजी घेतली. सईबाईर्ंच्या निधनानंतर त्याच त्यांच्या आई बनल्या व सावलीसारखी माया केली.
शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका, अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्लामसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वाहत. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतार वयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून इ.स. 1674 ला वयाच्या 80 व्या वर्षी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने जिजाबाईंचे निधन झाले. या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई या आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व
सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.

Mother of the Nation, Mother of the King, Mother of the Grandfather

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *