भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा भारतातील सर्वांत जुना पक्ष असून, भारतीय जनता पार्टी (भाजपा) हा भारतातील सर्वांत मोठा पक्ष आहे. भारतातीलच नव्हे, तर जगातील भाजपा हा सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा त्या पक्षाचे नेते करतात. भाजपाची देशात सत्ता असली, तरी जगातील सर्वांत मोठ्या पक्षाची जगावर सत्ता नाही, हा विनोदाचा भाग सोडून दिला, तरी भाजपाची आजची स्थिती पूर्वीच्या काँग्रेससारखी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांत भाजपाची अवस्था पूर्वीच्या काँग्रेससारखी झाल्याचे दिसत आहे. ब्रिटिश सरकारकडे लोकांच्या समस्या मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी झाली. त्यानंतर या पक्षाने स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आधी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा होत होता. टिळकांनंतर महात्मा गांधींनी काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर देशात आणि विविध राज्यांत काँग्रेसची सत्ता होती. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात या पक्षात मतभेद होतेच. मतभेद असणे हे काँग्रेसचे एक वैशिष्ट्य होते. भाजपातही मतभेद आहेत. केंद्रीय पातळीवरील मतभेद फारसे दिसत नसले, तरी राज्य आणि स्थानिक पातळीवरील मतभेद चव्हाट्यावर येतात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे 1964 मध्ये निधन झाल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याकडे खर्या अर्थाने आले. त्याआधी 1959 साली दिल्लीत पक्षाच्या विशेष अधिवेशनात त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. सन 1967 मध्ये काँग्रेसमधील काही प्रादेशिक नेत्यांनी सिंडिकेट करून इंदिरा गांधींना आव्हान दिले. सिंडिकेट नेत्यांनी काँग्रेस (संघटना) पक्ष स्थापन केला त्याला सिंडिकेट काँग्रेसही म्हटले जायचे. दुसरीकडे, इंदिरा गांधींनी आपला स्वतंत्र गट स्थापन करून पक्षही स्थापन केला. त्याला काँग्रेस (आर) म्हटले जायचे. तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांना कम्युनिस्ट आणि द्रविड मुनैत्र कळघम या पक्षांचा पाठिंबा होता. इंदिरा गांधींनी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. ती मंजूर झाल्यानंतर 1971 साली मध्यावधी निवडणुका झाल्या. त्यावेळी संघटना काँग्रेस, प्रजा समाजवादी, भारतीय जनसंघ (आजचा भाजपा) या पक्षांनी इंदिरा गांधींच्या विरोधात आघाडी केली होती, तर काँग्रेसने भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी युती केली होती. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले. पुढे इंदिरा गांधींच्या विरोधात विरोधक एकवटत होते. विरोधकांना वठणीवर आणण्यासाठी देशात अंतर्गत अस्थिरता निर्माण झाल्याचे कारण दाखवत इंदिरा गांधींनी 1975 साली आणीबाणी लादली. आणीबाणीत विरोधक आक्रमक झाले. आणीबाणीमुळे 1976 मध्ये निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. आणाबाणीतच 1977 साली घेण्यात आलेल्या निवडणुकांत इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसचा पराभव झाला. यानंतर 1978 साली इंदिरा गांधी यांनी काँग्रेस पक्षापासून अलग होऊन इंडियन नॅशनल काँग्रेस (इंदिरा) या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. या पक्षाला इंदिरा काँग्रेस किंवा काँग्रेस (आय) नावाने ओळखले जाऊ लागले. याच पक्षाने 1980 साली लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या. पुढे 1981 साली इंदिरा काँग्रेसला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. हाच खरा काँग्रेस पक्ष मानला गेला. आजही मानला जात आहे. इंदिरा गांधी यांचे काँग्रेसवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. केंद्रात आणि राज्यात त्यांचाच दबदबा निर्माण झाला. त्यावेळी निवडणुका लोकसभेच्या असो की विधानसभेच्या, काँग्रेसचे तिकीट म्हणजे लॉटरी. याचा अर्थ हमखास विजय, असे मानले जायचे. तिकीट मिळाले नाही म्हणून बंडखोरी व्हायची. सन 1984 साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर पक्षाची सूत्रे राजीव गांधी यांच्या हातात गेली. तेव्हाही पक्षाचे तिकीट म्हणजे लॉटरी, असे मानले जायचे आणि तिकीट मिळाले नाही म्हणून बंडखोरीही व्हायची. वरपासून खालपर्यंतच्या निवडणुकांत काँग्रेसच्या तिकिटाला महत्त्व होते. इतकेच नव्हे, पक्षातील पदांनाही महत्त्व होते. काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात हाणामार्या व्हायच्या. गटबाजीला उधाण येत असायचे. वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी केल्या जायच्या. बहुमताच्या बळावर हवे ते निर्णय काँग्रेसच्या राजवटीत घेतले जायचे. आजचा भाजपा बहुमताच्या जोरावर तेच करत आहे. काँग्रेसमध्ये पूर्वी जे व्हायचे किंवा जे काही होऊन गेले, तेच आज भाजपाच्या बाबतीत घडत आहे. भाजपाची उमेदवारी म्हणजे लॉटरी आणि विजय हमखास, असे आता म्हटले जाऊ लागले आहे. भाजपाची उमेदवारी मिळविण्यासाठी वशिलेबाजी, लॉबिंग असे प्रकार दिसून आले आहेत. तिकीट मिळाले नाही म्हणून भाजपात बंडखोरीही झाली, हाणामार्या झाल्या, नेत्यांना घेराव घातले गेले. नेतेमंडळींनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले. तिकिटाची पळवापळवी केली, निष्ठावंतांना आवाज उठववा लागला आहे. तिकीट मिळाले नाही म्हणून नेत्यांच्या नावाने शिमगा केला गेला. बोटे मोडली जात आहेत इत्यादी घटना व घडामोडी पाहिल्या, तर भाजपाचा काँग्रेस पक्ष झाला की काय, असा प्रश्न सहज उपस्थित झाला. जे जे काँग्रेसमध्ये पूर्वी घडून गेले ते ते सर्व इकडे भाजपामध्ये घडल्याचे दिसले आणि दिसून येत आहे. सर्वकाही पाहून काँग्रेसच्या जुन्याजाणत्या नेत्यांना भाजपाचा काँग्रेस झाल्याचा भास नक्की झाला असेल. काँग्रेसची चलती होती तेव्हा भाजपा आणि विरोधकांना कोणी विचारत नव्हते. आज भाजपाची चलती असून, काँग्रेस आणि विरोधकांना कोणी विचारायला तयार नाही. देश बदलला. काळ बदलला. सत्ता बदलली. भाजपाचा सूर्योदय झाला. काँग्रेसचा सूर्यास्त झाला. तळागाळापर्यंत काँग्रेस रुजलेली होती. भाजपाही तळागाळापर्यंत रुजत आहे. पूर्वीच्या काँग्रेससारखी आजच्या भाजपाची अवस्था झाली आहे. भाजपा हा केडरबेस्ड पक्ष म्हणजे शिस्तीच्या कार्यकर्त्यांचा पक्ष. काँग्रेस मासबेस्ड म्हणजे जनसमूहाचा पक्ष. काँग्रेसमध्ये कोणालाही सहज प्रवेश मिळत असायचा. त्यात कोणालाही प्रवेश. सत्ता मिळविण्यासाठी भाजपाने आपल्या विचारांशी सहमत नसलेल्या पक्षांशी युती केली. इतकेच नाही, तर काँग्रेससह इतर पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दरवाजे खुले केले. सत्तेच्या आश्रयास आलेल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना भाजपा व संघाची विचारसरणी समजली नाही. तशी ती समजावून सांगितली गेली नाही. पक्षात मासबेस्ड विरुद्ध केडरबेस्ड, असा संघर्ष सुरू झाला. महानगरपालिका निवडणुकांत तो मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती अशा विविध शहरांत दिसला. पक्षशिस्तीला तिलांजली देण्यात आली. ‘आओ जाओ घर अपना‘ असे भाजपाच्या बाबतीत म्हणायला काहीच हरकत नाही. कोण कधी पक्षात आले आणि कोण कधी बाहेर पडले? हे भाजपाच्या निष्ठावंत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कळेनासे झालंय. सत्तेसाठी काहीही करायला भाजपाची तयारी आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’ नारा देणार्या भाजपाने अंबरनाथ नगरपरिषदेत काँग्रेसशी हातमिळवणी केली. भाजपाशी हातमिळवणी करणार्या 12 नगरसेवकांना काँग्रेसने निलंबित केले. त्याच 12 नगरसेवकांना भाजपाने प्रवेश दिला. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत भाजपाने असाउद्दीन ओवैसी यांच्या ’एमआयएम’शी युती करताना विचारसरणी खुंटीला टांगून ठेवली. भाजपाची विचारसरणी मान्य नसलेल्या लोकांची पक्षात दाटीवाटी झाली आहे.
Yesterday’s Congress, today’s BJP
agralekh