निळवंडी शिवारात मजुरांची धावपळ; शेतकर्यांमध्ये घबराट
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील निळवंडी शिवारात बिबट्याचा वावर वाढल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील परिसरात ऊसतोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे चार बछडे आढळले. या घटनेमुळे शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये घबराट पसरली आहे.
निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. सध्या या भागात ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्याचे वारंवार वावर दिसून येत आहे. निळवंडी येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या गट क्रमांक 343 मधील एक एकर क्षेत्रात ऊसतोडणीचे काम सुरू होते. सकाळी आठच्या सुमारास ऊसतोड मजूर तोडणी कामात व्यस्त असताना उसाच्या दाट पाचटात बिबट्याचे दोन बछडे दिसले. अचानक बछडे समोर आल्याने ऊसतोड मजुरांची धावपळ उडाली. त्यांनी तातडीने शेतमालक अंबादास पाटील यांना ही माहिती दिली.
त्यानंतर शेजारीच असलेले चंदू भास्कर पाटील यांच्या गट क्रमांक 342 मधील ऊसतोडणीचे काम सुरू असताना दुपारी दोनच्या दरम्यान तिथेही दोन बछडे आढळले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित शेतकर्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क करून माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल भटू बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोरख गांगोडे, वनमजूर शिरसाठ, गांगोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी ऊसतोडणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले. मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे बछडे साधारण पंधरा ते वीस दिवसांचे असल्याचे वनरक्षक गोरख गांगोडे यांनी सांगितले. सध्या रब्बी हंगामामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हिरवळ असून, बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत असल्याने तो कधी आणि कुठून हल्ला करेल, याची भीती शेतकर्यांना सतावत आहे. बिबट्याच्या भीतीने अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. निंदणी, कोळपणी व ऊसतोडणीची कामे सुरू असतानाच बछडे आढळल्याने मजूरवर्गाने शेतात येण्यास नकार दिला आहे. विशेषतः महिला मजूर शेतीकामास येण्यास धजावत नाहीत.त्यामुळे शेतकर्यांना स्वतःच शेतीकामे करावी लागत आहेत. बछडे आढळल्याने मादी बिबट्या परिसरातच असल्याची शक्यता अधिक बळावली आहे. नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
ऊसक्षेत्र आणि नाल्यांचा परिसर, वाढलेली झाडेझुडपे यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा असल्याने परिसरातील शेतकर्यांनी सावधगिरीने शेतात काम करावे. पशुधन बंदिस्त गोठ्यात बांधावे. बाहेर लाइट लावावा. बालक व वयोवद्धांना एकटे बाहेर पडू देऊ नये. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना बॅटरीचा वापर करावा. शेतकर्यांनी काळजी घ्यावी. बिबट्याची कोणत्याही प्रकारची हालचाल आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधावा.
– गोरख गांगोडे, वनरक्षक, दिंडोरी
Four calves found in the field while cutting sugarcane