मालेगावला 609 बूथवर दोन बॅलेट युनिट

मनपा निवडणूक; 15 जानेवारीला 83 जागांसाठी मतदान

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेच्या 83 सदस्यांसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्याची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उमेदवारांची संख्या मोठी असल्याने यंदा अनेक बूथवर प्रत्येकी दोन बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. त्यामुळे मतदान करताना
मतदारांची काही प्रमाणात तारांबळ उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या गुरुवारी (दि. 15) मतदान होणार आहे. त्यापूर्वी बुधवारी (दि. 14) सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक साहित्य पोहोचविले जाणार आहे. ईव्हीएम सज्ज करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मनपाच्या 83 जागांसाठी यंदा 300 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, एक जागा बिनविरोध ठरली आहे. एकूण पाच लाख 17 हजार 663 मतदार आहेत. त्यांच्यासाठी 128 ठिकाणी 609 मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. ही निवडणूक 21 प्रभागांत होत असून, प्रत्येक प्रभागात दहापेक्षा जास्त उमेदवार आहेत.
एका प्रभागात चार सदस्य निवडले जाणार असून, त्यात अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र ’नोटा’ बटण द्यावे लागणार आहे. एका बॅलेट युनिटमध्ये केवळ 15 बटणे असल्याने उमेदवारांची संख्या आणि नोटा बटणांमुळे एका युनिटमध्ये मतदान घेणे शक्य नसल्याने अनेक ठिकाणी दोन बॅलेट युनिट वापरावे लागणार आहेत.
प्रत्येक वॉर्डाच्या उमेदवारांनंतर शेवटचे बटण ’नोटा’चे असून, त्यानंतर चारही प्रवर्गांसाठी स्वतंत्र नोटा बटणे द्यावी लागणार आहेत.
गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी एका प्रवर्गानंतर एक बटण मोकळे ठेवण्यात आले असून, त्यामुळे यंत्रांची संख्या वाढली आहे. सर्वाधिक उमेदवार प्रभाग क्रमांक दोनमध्ये 22 आहेत. सर्वांत कमी उमेदवारांची संख्या दहा असून, त्यात प्रभाग क्रमांक 4, 6, 11 व 19 यांचा समावेश आहे. प्रभाग सहामधील ‘क’ जागेवर विरोधी उमेदवार नसल्याने ती जागा बिनविरोध ठरली आहे.

दोन पिंक मतदान केंद्रे

मनपा निवडणुकीसाठी 128 शाळांमधील 609 बूथवर मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दोन बूथ महिलांच्या अधिपत्याखाली ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ठेवण्यात येणार आहेत. खैराबाद येथील मोती प्रायमरी स्कूलमध्ये खोली क्रमांक 1 व 2 या दोन खोल्यांची पिंक केंद्रासाठी निवड करण्यात आली आहे. येथे मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून सर्व महिलांचीच नियुक्ती असणार आहे.

वर्धमाननगरमध्ये आदर्श मतदान केंद्र

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार वर्धमाननगरातील वर्धमान इंग्लिश मीडियम स्कूलच्या दोन खोल्यांची ‘आदर्श मतदान केंद्र’ म्हणून निवड केली आहे. या केंद्रावर मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सर्व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Two ballot units at booth 609 in Malegaon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *