पश्चिम बंगालमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरण्याची तयारी भाजपाने आधीपासूनच सुरू केली आहे. बांगलादेशातून घुसखोरी, वंदे मातरम्, भ्रष्टाचार असे काही प्रश्न भाजपाकडून उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे, ममता बॅनर्जी काही कमी नाहीत. राज्यातील मतदारयाद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या नावाखाली निवडणूक आयोग मतदारांना त्रास देत आहे. मतदारांची नावे वगळली जात आहेत, असे आरोप त्यांनी निवडणूक आयोगावर केेले आहेत. त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पत्रेही पाठवली. परंतु त्यांना दाद मिळाली नाही. निवडणूक आयोग भाजपासाठी काम करत असल्याचा विरोधकांचा सार्वत्रिक आरोप आहे. तोच आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर ममता बॅनर्जी निशाणा साधत आहेत. अत्यंत आक्रमक व तापट स्वभावाच्या ममता बॅनर्जींनी राज्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून खाली खेचले. गेल्या काही निवडणुकांपासून त्या भाजपाचा एकहाती मुकाबला करत आहेत. कोणी हल्ला करण्यासाठी धावून आले, तर त्या चवताळून उठतात आणि जशास तसे उत्तर देतात. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स (आयकर) या संस्थांचा गैरवापर विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून केला जात असल्याचा आरोप काही नवीन नाही. तृणमूल काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन पाहणार्या एजन्सीच्या कोलकातामधील कार्यालयावर ईडीने 8 जानेवारी रोजी छापा टाकल्याचे कळताच ममता बॅनर्जी यांचा पारा चढला. त्यांनी लागलीच स्थानिक पोलिसांच्या मदतीने एजन्सीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. कार्यालयात जाऊन त्यांनी आपल्या पक्षाच्या काही फाइल्स ताब्यात घेतल्या. इतकेच नाही, तर ईडीच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित ईडी असल्याने हा छापा गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून टाकण्यात आल्याचा आरोप ममतांनी केला. पश्चिम बंगालमध्ये ममता विरुद्ध ईडी असा सामना रंगत असून, प्रकरण चिघळले आहे. चौकशीत हस्तक्षेप केला म्हणून ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारी याचिका ईडीने कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली. दुसरीकडे, ईडीने आपल्या पक्षाची कागदपत्रे आणि डिजिटल माहिती चोरल्याचा दावा करत तृणमूल काँग्रेसनेही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकांवरील सुनावणीच्या वेळी दोन्ही बाजूंच्या वकिलांनी गदारोळ केल्याने न्यायमूर्तीना आसन सोडून निघून जावे लागले. त्यांनी पुढील सुनावणी 14 जानेवारी रोजी ठेवली. दरम्यान, ममता बॅनर्जी यांची सीबीआय चौकशी करावी म्हणून ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये याच वर्षी होणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण चांगलेच तापले आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने ते तापवतच ठेवण्याचे ठरविले असल्याचे दिसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनेही केली. ईडीच्या विरोधात ममतांनी कोलकात्यात मोर्चाही काढला. ईडीच्या विरोधात आपल्याकडे पेनड्राइव्ह असल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपा, निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात ममता बॅनर्जी अत्यंत आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ईडीच्या कामात अडथळा आणलाच. त्याशिवाय त्यांच्या पक्षाने दिल्लीत अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनेही केली. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत आणि जाहीर झाल्यानंतर बंगाल तापलेला असेल. ममता बॅनर्जी आपला संताप वेगळ्याच पद्धतीने व्यक्त करतील. निवडणूक तोंडावर आली असताना तृणमूल काँग्रेसच्या एजन्सीवर छापा टाकण्याची कारवाई संशयास्पद आहे. म्हणून ममता बॅनर्जी यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण करण्याचे काम सुरू केले आहे. आयोगाकडून मतदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी नाहक त्रास दिला जात असल्याचा ममतांचा आरोप आहे. मतदारांनी दिलेल्या माहितीत त्रुटी काढून त्यांची नावे कमी करण्याचा ममतांचा आरोप आहे. त्यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निवेदने दिली; परंतु त्यांनी काहीच दखल घेतली नाही. निवडणूक आयोग आणि ईडी भाजपाच्या इशार्याने काम करत असल्याचा ममतांचा आरोप आहे. ईडीने आय-पॅकच्या कार्यालयावर छापा टाकला. याची माहिती मिळाल्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: छापा पडला त्या ठिकाणी गेल्या. ईडीच्या अधिकार्यांनी जप्त केलेल्या हार्ड डिस्क ममता आपल्यासोबत घेऊन गेल्या. कारवाईच्या वेळी ममतांनी कॅमेर्यासमोरच बाचाबाची करण्याचे साहस केले. छापा खोट्या सरकारी नोकरीच्या घोटाळ्याशी संबंधित होता. कोळसा खाण घोटाळ्याशीही आहे, असा ईडीचा दावा आहे. तृणमूलने 2022 मध्ये गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीत जो खर्च केला होता तो हाच पैसा होता, असा ईडीचा संशय आहे. आय-पॅक ही संस्था प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेली कंपनी किंवा एजन्सी आहे. गेल्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या प्रचारमोहिमेचे काम आय-पॅकनेच सांभाळले होते. प्रशांत किशोर नंतर एजन्सीतून बाहेर पडले. मात्र, आय-पॅकचे सहसंस्थापक प्रतीक जैन अजूनही कार्यरत आहेत आणि ते ममतांचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार आहेत. त्यामुळेच प्रतीक जैन यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे पडल्यावर ममता संतप्त झाल्या. आपली निवडणूक रणनीतीची गुपिते ईडीमार्फत भाजपपर्यंत पोहोचतील असे त्यांना वाटते. या छाप्यात जे दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे प्राप्त केले होते ते ममतांनी पळवल्याचा ईडीचा आरोप आहे. बॅनर्जी भाजपाच्या विरोधात आहेतच. त्या मोदी-शहांना थेट आव्हान देत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ममतांची बाजू घेतली नाही. काँग्रेसनेही घेतली नाही. हे दोन्ही पक्ष ममतांच्या विरोधात आहेत. विधानसभा निवडणूक जवळ आली असताना ईडीने केलेली कारवाई संशयास्पद वाटणारी आहे. भाजपाच्या कलाने ईडीचा कारभार चालतो, हा आरोप पाहता ईडीवर संशय व्यक्त होणे स्वाभाविक आहे. ममता बॅनर्जी यांनी जे धाडस दाखविले, त्याचे कौतुक जम्मू-काश्मीरमधील पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केले. त्यांनी ममतांचा उल्लेख बंगाली टायग्रेस (बंगाली वाघीण), असा केला. ममतांना समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, आम आदमी पार्टी या पक्षांचा पाठिंबा मिळू शकतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ममतांचे कौतुक केले आहे. सर्वोच्च न्यायालयात ईडीने दाखल केलेल्या याचिकेवर ममतांचे भवितव्य अवलंबून आहे. ईडीची कारवाई न्यायोचित होती की नाही?, ममतांची कृती ईडीच्या कामात हस्तक्षेप करणारी होती काय? या प्रश्नांची उत्तरे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात मिळतील. परंतु भाजपाकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप सर्वच विरोधी पक्षांचा आहे. ईडीला अटकाव करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाला आहे, असे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल म्हणतात. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अनेकदा विरोधकांची बाजू मांडलेली आहे. आपापली बाजू मांडण्यासाठी ममता बॅनर्जी त्यांचीच नियुक्ती करतील, असे दिसते. सर्वोच्च न्यायालयात काय होईल ते होवो, ममता बॅनर्जी आता शांत बसणार नाहीत. ईडीचा गैरवापर, मोदी-शहांची गुंडगिरी, निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा, बंगाली अस्मिता, असे काही मुद्दे उपस्थित करून त्या आणखी आक्रमक होतील.
Mamata is angry!