आज भोगी सण, मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात उत्साह
नाशिक : प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. आज, मंगळवार (दि.13) भोगी सण आहे. यंदा मकरसंक्रांतीच्या सणावर निवडणुकांचे सावट असल्याने सण झाकोळला गेल्याचे चित्र आहे. सर्वत्र निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे सणाच्या निमित्ताने संक्रांतीचा सण कॅच करण्याचा उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. भोगी, संक्रांतीनिमित्त नागरिकांना मतांचा तीळगूळ पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ असल्याचे दिसत आहे.
भोगीसाठी खास वाल, वांगी, घेवडा, ओला हरभरा, गाजर, वाटाणा आदी भाज्या व तीळ टाकून भाकरी केल्या जातात. भोगीचा नैवेद्य देवाला दाखविण्यात येतो. शहर व उपनगरांत भोगी आणि संक्रांतीसाठी भाज्या, वाणोसा आदी उपलब्ध आहे. त्याच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली होती. भोगीला सुगड पूजण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी वाणपूजन प्रथा असेही म्हटले जाते. यात पाच सुगड पूजले जातात. या पाच सुगडांंत भाजी-भाकरी ठेवले जाते. सुगडांतील भाजी-भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसर्या दिवशी म्हणजे किक्रांतीला खायची प्रथा आहे.संक्रांतीच्या दिवशी या सुगडांचा विवाहित स्त्रियांना वाणोसा दिला जातो. त्यानंतर ओटी भरण व हळदी-कुंकू असे कार्यक्रम होतात.
मकरसंक्रांतीचे तीन दिवस महत्त्वपूर्ण असतात. त्यात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा करतात. थंडीच्या दिवसांत ज्या भाज्या उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते. त्याला भोगीची भाजी म्हणतात. त्यात आवर्जून तीळ टाकला जातो. असा सर्वगुण संपन्न, उर्जादायक, उष्णता निर्माण करणारा आहार घेतला जातो.
वाल, घेवडा, वाटाणा, गाजर जे काही शेतात पिकेल त्याचा मसालेभात तयार केला जातो. सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यात चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा यांचा समावेश असतो. सकाळी लवकर उठून महिला अभ्यंगस्नान करतात. नवीन अलंकार परिधान करतात. घरासमोर रांगोळी काढतात. उपभोगाचे प्रतीक असणार्या इंद्रदेवाची पूजा केली जाते. यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मतांसाठी महिलावर्गाला खूश करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विविध वाण लुटून मतांचा तीळगूळ पदरात पाडण्यात येत आहे.
The battle for votes