जि.प., पं.स. निवडणुकांची घोषणा

12 जिल्ह्यांत 5 फेब्रुवारीला मतदान, नाशिकचा समावेश नाही

मुंबई :
नगरपालिका, महापालिका निवडणुकांनंतर राज्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा मंगळवारी (दि. 13) निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. राज्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे, सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला.
राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 7 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता निकाल जाहीर होणार आहे. आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांंच्या निवडणुकांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत.उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
दुसर्‍या टप्प्यात इतर जिल्हा परिषदा
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांच्या वर गेलेल्या जिल्हा परिषदांची निवडणूक दुसर्‍या टप्प्यांमध्ये घेतली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ दिल्याने आता 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पूर्ण करणे निवडणूक आयोगाला बंधनकारक असणार आहे. मात्र, राज्यातील उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल. त्याविषयी काहीही निर्णय करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही, असेही दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले. एकीकडे राज्यात 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 16 जानेवारीला सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, महानगरांमध्ये निवडणुका संपताच, ग्रामीण महाराष्ट्रात निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
सात कोटींची रक्कम जप्त
निवडणूक काळात भरारी पथकाकूडन आत्तापर्यंत 7 कोटी रक्कम रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मद्यपदार्थांसह 5 कोटी पेक्षा जास्त रकम जमा केली आहे. तसेच, 95 शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली असून राज्यभरात प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. उमेदवारांकडून पैसे वाटण्यासंदर्भातील तक्रारी आम्ही महापालिका आयुक्तांकडे पाठवतो, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तर, राज्यातील 3796 मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत, अशी माहिती दिली.

संपूर्ण निवडणूक कार्यक्रम असा…
4नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे – 16 ते 21 जानेवारी 2026
4उमेदवारी अर्जांची छाननी – 22 जानेवारी 2026
4अर्ज माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत.
4अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप- 27 जानेवारी दु. 3.30 नंतर
4मतदान 5 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत. 4मतमोजणी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपासून.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *