सिकलसेल मुक्तीसाठी उद्यापासून विशेष अभियान

आरोग्य कर्मचारी घरोघरी करणार तपासणी

सिन्नर : प्रतिनिधी
राष्ट्रीय सिकलसेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशनअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाने सिकलसेल मुक्तीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील सिकलसेलचा प्रादुर्भाव असलेल्या 21 जिल्ह्यांमध्ये 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत ‘सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान’ राबवले जाणार आहे.

असे आहेत अभियानाचे टप्पे

पहिला टप्पा (15 ते 20 जानेवारी)- जुन्या सिकलसेल रुग्णांची तसेच अद्याप एकदाही तपासणी न झालेल्या व्यक्तींची यादी तयार केली जाणार आहे. दुसरा टप्पा (21 ते 26 जानेवारी) -ज्यांची सोल्यूबिलिटी टेस्ट झालेली नाही, अशा 0 ते 40 वयोगटातील व्यक्तींची प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे. तिसरा टप्पा (27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी)-ज्यांची प्राथमिक चाचणी झाली असून, इलेक्ट्रोफोरेसिस तपासणी प्रलंबित आहे, अशांची अंतिम तपासणी केली जाणार आहे.

या मोहिमेत सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य कर्मचारी थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचून तपासणी व जनजागृती करणार आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अभियान तीन टप्प्यांत राबवले जाणार असून, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक व सेविकांच्या माध्यमातून सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. संशयित रुग्णांचा शोध युद्धपातळीवर घेतला जाणार असून, 0 ते 40 वयोगटातील नागरिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान केवळ तपासणीच नव्हे, तर सिकलसेल बाधित रुग्णांना ‘हायड्राक्सीयुरिया’ गोळ्यांचा मोफत पुरवठा तसेच आवश्यकतेनुसार मोफत रक्तपुरवठादेखील करण्यात येणार आहे. आरोग्य प्रशासनाने नागरिकांनी या अभियानात सहकार्य करून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Special campaign for sickle cell eradication from tomorrow

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *