नाशिक, मालेगाव मनपासाठी आज मतदान

तयारी पूर्ण; कडेकोट पोलीस बंदोबस्त

चार वेगवेगळ्या रंगांच्या मतपत्रिका
4अ-गटासाठी पांढर्‍या रंगाची.
4ब-गटासाठी गुलाबी रंगाची.
4क-गटासाठी पिवळ्या रंगाची.
4ड-गटासाठी निळ्या रंगाचे ईव्हीएम मशिन असेल.

नाशिक : प्रतिनिधी
लोकशाहीचा उत्सव असलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. आज (दि. 15) नाशिक महापालिकेच्या 122, तर मालेगावच्या 83 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. काल मतदान यंत्रे आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचले असून, निर्भयपणे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाने गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती. त्यामुळे त्याचा किती परिणाम होतो? याकडे लक्ष लागले आहे. 13 लाख 60 हजार 722 मतदार नाशिक महापालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात महिलांची संख्या 6 लाख 56 हजार 675, तर पुरुष मतदारांची संख्या 7 लाख 3 हजार 968 आहेत. नाशिक शहरात एकूण 1,563 मतदान केंद्रे आहेत.
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या 31 प्रभागांमध्ये एकूण 122 सदस्यांसाठी ही निवडणूक होत असून, निवडणूक यंत्रणेची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य बुधवारी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या माध्यमातून संबंधित मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यकांना यशस्वीरीत्या वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया नियोजनबद्ध व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना एकूण चार मते द्यावयाची आहेत. उमेदवारांच्या संख्येनुसार मतदान केंद्रावर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन) उपलब्ध असतील. तेव्हाच मतदान झाल्याचा आवाज येईल
एकूण 4 उमेदवार निवडून द्यावायची असल्याने 4 मतदान दिल्यानंतर म्हणजेच सर्व गटांतील मतदान पूर्ण झाल्यानंतर एक मोठा ‘बीप’ आवाज येईल, ज्यामुळे मतदाराचे मतदान यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची खात्री होईल. प्रभाग क्रमांक 15 व प्रभाग क्रमांक 19 मध्यें केवळ तीन उमेदवार निवडून द्यावंयची आहेत, त्या ठिकाणी मतदारांनी तीनच मते द्यावयाची आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मतदानाची प्रक्रिया मतदारांना सहज, सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजावी. या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेच्या वतीने व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक महानगरपालिका आयुक्त व प्रशासक मनिषा खत्री यांनी नाशिककर मतदारांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी साताळकर यांचे आवाहन
वोटकर नाशिककर अशी हाक देत त्यांनी प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान द्यावे. तसेच नाशिक महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक, मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततामय आणि लोकशाही मूल्यांना साजेशी पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा सार्वत्रिक निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा मनपा उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांनी केले आहे.
पक्षनिहाय उमेदवारांची स्थिती- मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला 21 प्रभागांतील सर्व 84 जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. उद्धवसेनेने 11, राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी प्रत्येकी 10 उमेदवार दिले आहेत. भाजपने केवळ पश्चिम भागातील पाच प्रभागांत 20 उमेदवार उभे केले असून शिंदेसेनेने 24 उमेदवार दिले आहेत. काँग्रेसकडे छाननीनंतर केवळ 18 उमेदवार शिल्लक राहिले आहेत, तर एमआयएमने सर्वाधिक 49 उमेदवार दिले आहेत.माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या मालेगाव सेक्युलर फ्रंटकडून इस्लाम पार्टीचे 48, समाजवादी पार्टीचे 18 व वंचित बहुजन आघाडीचे 4 असे एकूण 70 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तरीही या फ्रंटला 14 जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना आदी 12 पक्षांची मालेगाव महाविकास आघाडी स्थापन झाली असून प्रत्यक्षात सर्व पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.

Voting for Nashik, Malegaon Municipal Corporation today

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *