भागवत उदावंत
नाशिक : आयारामांमुळे निष्ठावांनांनी केलेला आक्रोश, एबी फॉर्मची पळवापळवी, पक्षीय उमेदवारांपुढे पक्षातीलच बंडखोरीने अपक्ष मांड ठोकत दिलेले आव्हान, तपोवन आणि ’दत्तक नाशिक’वरून रंगलेले राजकारण, सत्तेतील पक्षांनीच एकमेकांसमोर उभे केलेले आव्हान, अशा सर्व परिस्थितीत नाशिक महापालिकेची निवडणूक आज होत आहे. 122 जागांसाठी सातशेहून अधिक उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद होणार आहे. तब्बल आठ वर्षांनंतर होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी महायुतीमध्येच खरी चुरस दिसून येत असली, तरी विरोधी पक्षांनी काही ठिकाणी कडवे आव्हान उभे केले आहे. नाशिककर मतदार राजा नेमका कोणत्या पक्षावर उदार होतो, याचे उत्तर येत्या 16 तारखेला मिळणार आहे.
नाशिक महापालिकेत मागील वेळेस भाजपाची सत्ता होती. देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या सभेत केलेल्या आक्रमक भाषणात नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली आणि नाशिककरांनी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले होते. पाच वर्षांत गोदावरीतून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता आगामी सिंहस्थ कुंभमेळा उंबरठ्यावर उभा आहे. त्यासाठी तीस हजार कोटींचे बजेट आहे. सिंहस्थातून होणार्या अमृताच्या वर्षावाचे काही तुषार आपल्याही पारड्यात पडावेत म्हणून सर्वच पक्ष कामाला लागले. सत्तेच्या सावलीत जाण्यासाठी यावेळी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतराची लाट आली. भारतीय जनता पार्टीने आयारामांना घेताना स्वपक्षातील निष्ठावानांचा आक्रोश ऐकला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशीच भाजपा कार्यालयासमोर राडा झाला. पण तरीही निष्ठावानांच्या विरोधाला फाट्यावर मारत काही मंडळींचा प्रवेश सोहळा झालाच. अगदी आमदारांचे अश्रूदेखील गोदावरीच्या पाण्यात वाहून गेले. आयारामांच्या पक्षांतराचा पहिला अंक संपत नाही तोच एबी फॉर्मच्या दिवशी झालेला गोंधळ, पाठलाग अगदी गेट तोडेपर्यंतचा तमाशा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. शेवटपर्यंत युती होणार होणार असे म्हणत झुलवत ठेवत ऐनवेळी शिंदे गटाला टांग मारण्यात आली. शिंदे गटही मग अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोबत घेत ही लढाई जिंकण्याच्या त्वेषाने मैदानात उतरले. काँग्रेसचा जीव शहरात अगदीच तोळामासा झालेला आहे. असे असताना काँग्रेसनेही काही निष्ठावानांना ऐनवेळी हात दाखविला. त्यामुळे संतापलेल्या या मंडळींनी थेट काँग्रेस कमिटीलाच टाळे ठोकले. अजून ते टाळे उघडलेले नाही. शिवसेना उबाठा आणि मनसेने आघाडी करत महायुतीपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हे करताना त्यांनीही पक्षातील काही मंडळींना ऐनवेळी माघार घेण्यास भाग पाडल्याने ते नाराज झाले. आणि त्यांनी भाजपाचे ’कमळ’ हाती घेणे पसंत केले. काहींनी केवळ विकासासाठी एका रात्रीत पक्ष बदलले. काहींनी आठ दिवसांत एका पक्षातून दुसर्या पक्षात उडी मारली. हे केवळ विकासासाठीच केल्याची मखलाशी ही मंडळी करीत आहेत. इतक्या वर्षांनंतरही जर विकासासाठीच हे सर्व चाललेय तर मग आजपर्यंत विकास झाला का नाही? नेमका विकास हरवला कुठे? असे विचारण्याची वेळ आज नाशिककरांवर आली आहे.
ठाकरे बंधूंनी अनंत कान्हेरे मैदानावर घेतलेल्या सभेने शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या शिडात हवा भरण्याचे काम केले आहे. गोदाघाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सिंहस्थात नाशिक कसे आधुनिक शहर बनेल आणि दत्तक नाशिकवरून ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेलाही उत्तर देण्याचा प्रयत्न केला.ठाकरे बंधूंनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनंत कान्हेरे मैदानावर घेतलेल्या विराट सभेने शिंदे गटानेही चांगलाच जोर लावलेला दिसला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे या दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. नगरपरिषद निवडणुकीत पाच नगरपरिषदा जिंकून दादा भुसे यांनी आपली ताकद सिद्ध केली. आता महापालिकेतही शिवसेनेचा महापौर बसविण्याच्या ईर्षेने ते मैदानात उतरले आहेत. भाजपला काहीही करून आगामी सिंहस्थासाठी मनपावर सत्ता हवी आहे. प्रचारात विकासाच्या मुद्यांबरोबरच तपोवनातील वृक्षतोड आणि शहरातील गुंडगिरीचे मुद्देही चांगलेच गाजले. अखेरच्या टप्प्यात ’लाव रे तो व्हिडीओ’वरून संकटमोचकाच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचे प्रकार घडले. पक्षीय उमेदवारांविरोधात काही ठिकाणी पक्षातील बंडखोरांनी दिलेल्या आव्हानामुळे निकाल काय लागणार? याबाबत मतदारही साशंक आहेत. निष्ठावंतांनी भाजप शहराध्यक्षांना कोंडण्याबरोबरच त्यांना गाजरेही भेट दिली होती. त्यांनीही या गाजराचा हलवा करून खाल्ला, असे उत्तर देत निष्ठावानांच्या भावनांना काहीच किंमत नाही, हे दाखवून दिले. अशा सर्व परिस्थितीत आज होत असलेल्या या मतसंघर्षात नाशिककर जनतेच्या मनात नेमके काय आहे, याचे उत्तर 16 तारखेला कळणार आहे.