चला मतदान करूया!

तब्बल आठ वर्षांनंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत असल्याने यंदा राजकीय पक्षांची नेतेमंडळी, कार्यकर्ते यांसह सामान्य नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसले. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने आपल्या मतदार क्षेत्रातील गल्लीबोळ पिंजून काढला आहे. नानाविध आश्वासने दिली आहेत.
आजतागायत झालेल्या प्रचाराच्या व्याप्तीवरून पक्षाच्या प्रमुख मंडळींनी यशापयशाची गणिते मांडण्यासही सुरुवात केली आहे. यंदा पक्ष आणि उमेदवार यांच्याकडून प्रचारासाठी जीवाचे रान केले असले, तरी मतदान करण्यासाठी मतदार किती प्रमाणात घराबाहेर पडतात यावरून पक्षांचे आणि उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. महापालिका क्षेत्रातील सरकारी यंत्रणांनी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आटोकाट प्रयत्न केले आहेत.
विविध माध्यमांतून जागृतीही केली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे ही शहरे दाट लोकवस्तीची असल्याने या ठिकाणी उभारण्यात येणारी मतदान केंद्रे नागरिकांच्या घरापासून जेमतेम एक किलोमीटरच्या अंतरात असतात. तरीही अनेक नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडण्यास, मतदानासाठी रांग लावण्यास इच्छुक नसतात हे आजतागायतचे निरीक्षण आहे. असे असले, तरी काही गोष्टींचे कौतुकही वाटते. वयाची नव्वदी-शंभरी गाठलेले ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडतात. अधू, अपंग नागरिक इतरांच्या सहाय्याने उत्साहाने मतदान करताना प्रत्येक वेळेस दिसून येतात. नोकरी, व्यवसायानिमित्त देशाबाहेर गेलेले काही नागरिक केवळ मतदान करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात. या सर्वांचा उत्साह पाहिल्यावर जे नागरिक मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नाहीत, मतदानानिमित्त मिळालेल्या सुट्टीचा उपयोग मौजमजा करण्यासाठी आणि सहलीला जाण्यासाठी करतात, त्यांची लोकशाही उपभोगण्याचीच पात्रता नाही असे वाटते. नगरसेवक हा सामान्य नागरिकाचा सर्वांत जवळचा लोकप्रतिनिधी असतो. आपल्या प्रभागातील नागरिकांना अनेकदा तो वैयक्तिकरीत्या ओळखत असतो. आपल्या परिसरातील लहानसहान समस्या घेऊन त्याच्याकडे जाता येते. त्याचे सहाय्य घेता येते. त्यामुळे हा लोकप्रतिनिधी निवडण्यात आपल्या प्रत्येकाचा सहभाग असणे अत्यंत आवश्यक आहे.
नगरसेवक निवडताना सध्या वारे कोणत्या पक्षाचे आहे, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असायला हवी या गोष्टी बाजूला ठेवून आपल्या प्रभागाच्या समस्या सोडवण्यास कोणता उमेदवार सक्षम आहे, स्वहितापेक्षा जनहिताला प्राधान्य देणारा उमेदवार कोणता आहे, नागरिकांच्या अडीअडचणींवेळी उद्या कोण धावून येऊ शकतो या गोष्टी लक्षात घेऊन मतदान करायला हवे. मतदान म्हणजे कोण्या राजकीय नेत्यावर किंवा पक्षावर उपकार करणे नव्हे, तर आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी योग्य लोकप्रतिनिधींची निवड करणे ही भावना लोकांमध्ये केव्हा जागृत होणार? आपल्या, आपल्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या भवितव्यासाठी आपले एक मतही बहुमोल कामगिरी करणारे ठरणार आहे. त्यामुळे निरुत्साह झटकून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडूया!

Let’s vote!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *