महानगरांतील महासंग्राम

महानगरांतील महासंग्राम

महाराष्ट्रातील मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ
सामना होता. नगर परिषदा निवडणुकांत सरळ सामना दिसला नाही, तर महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांनी सोयीनुसार स्वबळ अजमावले. त्यात महायुतीतील पक्षांची सरशी झाली. महानगरपालिका निवडणुकांत महायुती तुटली, तर महाविकास आघाडी फुटली आहे. कोणाचा कशात पायपोस नाही. कोण कोणाला पायात पाय घालून पाडेल, याचा नाही भरवसा नाही. पक्षनिष्ठा गळून पडल्या, निवडून येण्याची क्षमता हाच निकष उमेदवार्‍या देताना पाळला गेल्याने निष्ठावंतांना तोंड दाबून
बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. निवडणूक लढविण्यासाठी निष्ठावंत असण्याचा निकष गळून पडला. निष्ठावंत असण्याला किंमत नाही, हे कार्यकर्त्यांना कळून चुकले. आघाडी किंवा युती काही
कामाची नाही, हेही निष्ठावंतांच्या लक्षात आले. घडवायचे आणि मोडायचे, मोडल्यानंतर पुन्हा नवीन घडवायचे, नवीन घडवलेले टिकवण्याची खात्री नसल्याने पुन्हा नवीन घडविण्याची तयारी असे
भातुकलीचे खेळ मतदारांना पाहावयास मिळाले. उमेदवार आता मतदारांच्या समोर आहेत. मतदारांना उमेदवार जितके ओळखून आहेत, त्यापेक्षा अधिक प्रमाणात मतदारांना उमेदवार ओळखून आहेत. कोण आधी कुठं होतं, आता कुठं आहे. कोण जागेवरच का आहे आणि कोणी जागा का बदलली, हे मतदारांच्या चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळे परीक्षा उमेदवारांची आहे ती मतदारांसमोर! कोण बंडखोर, कोण उपरा, कोण निष्ठावंत, कोण चांगला, कोण कामाचा या प्रश्नांची उत्तरे मतदारांना आता माहिती झालेली आहेत. महाविकास आघाडी का फुटली? आणि महायुती का तुटली? हेही मतदारांच्या लक्षात आलेले आहे. मतदार आपला कौल देण्यास सज्ज झालेले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई आणि ठाणे अशा काही मोठ्या महानगरपालिका आहेत, त्याचप्रमाणे मध्यम व लहान आकाराच्या नाशिक, पिंपरी-चिंचवड, अमरावती, अकोला,
उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, मालेगाव, लातूर, अहिल्यानगर अशा काही महापालिका आहेत.मुंबई देशातील सर्वात मोठी आणि श्रीमंत महापालिका असून तिचे वार्षिक अंदाजपत्रकच सुमारे 60 हजार कोटी रुपयांचे असते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महानगरपालिकेला अतिशय महत्त्व आहे. गेल्या 20-22 वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचे मुख्य क्षेत्र असले तरी महाराष्ट्रात इतर भागातही शिवसेनेने आपले प्रभावक्षेत्र निर्माण केले होते. राज ठाकरे यांनी स्वत:चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला. मुंबईतील मराठी भाषक भागांमध्ये राज ठाकरेंना बर्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि शिवसेनेला त्याचा फटका बसला. सन 2009 मधील विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला मोठा फटका बसला
होता. एकोणीस वर्षांच्या संघर्षानंतर उद्धव आणि राज हे दोन भाऊ एकत्र आले आहेत. एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसला बाजूला ठेवले आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत ठाकरे बंधूंसोबत आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद कमी होत गेली. . सन 2019 मध्ये अध्दव ठाकरेंनी भाजपाशी काडीमोड
घेऊन दोन्ही काँग्रेस पक्षांशी आघाडी केली. हा निर्णय शिवसेनेच्या सर्वच मतदारांना पचला नव्हता. त्यातच एकनाथ शिंदे यांनी उदद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले आणि मुख्यमंत्रीपदावर राहून
आपला पक्ष (गट) बळकट केला. त्यामुळे लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषदा या तिन्ही निवडणुकांमध्ये शिंदे यांच्या पक्षाची कामगिरी सरस होती शिवसेनेचा मतदार शिंदेंकडे सरकला, तरी
मुंबईत शिंदेंपेक्षा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जास्त पाठिंबा आहे. त्यामुळेच अगदी विपरित परिस्थितीतही ठाकरे यांनी विधानसभेच्या दहा जागा मुंबईत जिंकल्या होत्या. नगर परिषद निवडणुकांमध्ये ठाकरे गटाला अपयश आले. मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी काँग्रेसऐवजी राज ठाकरे यांचा पाठिंबा जास्त महत्त्वाचा ठरू शकेल, असे उद्धव ठाकरे यांना वाटले . मराठी अस्मिता, मराठी भाषा, मुंबईचे भवितव्य, परप्रांतियांचे आक्रमण या विषयांवर आक्रमक प्रचार करुन मुंबईतील 36 टक्के मराठी मते संघटित करायची तर राज ठाकरे यांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे, हे उद्धव यांनी जाणले.
काँग्रेस बरोबर असताना गुजराती आणि उत्तर भारतीयांविरुद्ध आक्रमक प्रचार करता येत नाही, याची जाणीव त्यांना झाल्याने उध्दव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टाळी दिली. काँग्रेसलादेखील परप्रांतियांविरुद्ध आगपाखड करणार्या राज ठाकरे यांच्याबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस राजी झाली नाही. काँग्रेसने ठाकरे बंधूंना बाजूला ठेवून मुंबईत वंचित बहुजन आघाडीशी युती
केली आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या माध्यमातून दबदबा निर्माण केला. परंतु, पक्षाची संघटना नीट बांधता आली. कधी भाजपाला विरोध, तर कधी पाठिंबा अशा धरसोडपणामुळे त्यांचा दबदबा कमी होत गेला. अशा परिस्थितीत परत उठून उभे राहण्यासाठी उध्दव ठाकरे यांच्याशी हातमिळवणी करणे राज ठाकरेंना भाग पडले.
ठाकरे बंधूंची युती मुंबई, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभावी ठरण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये महायुती (भाजपा-शिवसेना-शिंदे) ठाकरे बंधू युती (शरद पवार यांच्यासह, काँग्रेस-वंचित युती अशी तिरंगी लढत दिसत आहे. मराठी आणि मुस्लिम मतदार उद्धव यांचे बळ आहे. भाजपाचा प्रयत्न बिगरमराठी मतदारांना संघटित करण्याचा आणि मराठी मतदारांना मोदींच्या नेतृत्वाकडे आकर्षित करण्याचा आहे. एकूणच
विशेषत: मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चुरशीची होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नगरपरिषदांमध्ये भाजपाला मोठे यश मिळाल्यामुळे इतर पक्षांमधील अनेक कार्यकर्ते व नेते भाजपामध्ये गेले आहेत. विरोधकांना कमकुवत करण्यासाठी भाजपाने बाहेरच्या कार्यकर्ते व नेत्यांसाठी दरवाजे उघडे ठेवले. त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले. दलबदलूंना तिकिटे मिळाल्याने निष्ठावंत आणखी नाराज झाले. पिंपरी चिंचवड व पुणे महालिकांच्या निवडणुकीसाठी शरद पवार व अजित पवार एकत्र आले आहेत. या दोन्ही ठिकाणी भाजपा स्वबळ आजमावत आहे. नाशिकमध्येही भाजपा स्वबळ
आजमावत असल्याने शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी युती केली. स्थानिक निवडणुकांत मतदार पक्षांपेक्षा उमेदवाराला महत्त्व देतात मग तो कोणत्याही पक्षाचा असो. इतकेच नव्हे, तर बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांनाही पसंती मिळते. बंडखोर आणि अपक्ष तसेच लहान पक्षांचे उमेदवारही मान्यताप्राप्त राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना भारी पडतात.काही अपवाद वगळता मतदार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला पसंती देतात. दिसतील. बंडखोर उमेदवार बळकट आहे किंवा त्याच्यावर
अन्याय झाला आहे काय , याचाही विचार मतदार करतात. महायुतीत फाटाफूट आणि महाविकास आघाडीची बिघाडी झाल्याचे दिसत आहे. एकत्र राहणारे पक्ष विखुरलेले गेले आहेत. कुठे भाजपा विरुध्द शिंदे-शिवसेना, तर कुठे भाजपा विरुध्द अजित पवार – राष्ट्रवादी काँग्रेस अशा लढती होत आहेत. काही ठिकाणी शिंदे-शिवसेनेच्या विरोधातअजित पवार – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले आहेत. तर काही भाजपाच्या विरोधात शिंदे-शिवसेना आणि अजित पवार-राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली
आहे. काही ठिकाणी महायुतीतील तिन्ही पक्ष स्वबळावर मैदानात उतरले आहेत. महाविकास आघाडीतील उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेने राज ठाकरेंच्या मनसेशी युती केली आहे. या युतीत काही
ठिकाणी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. काही ठिकाणी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. काही ठिकाणी, तर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी जसे जमेल तसे मार्क्सवादी कम्युनिस्ट, शेचकरी कामगार पक्ष यांना हाताशी धरले आहे. महायुतीतही तसेच जनसुराज्य, रिपब्लिकन (आठवले), रिपब्लिकन सेना यांच्या बाबतीत दिसून येत आहे. कोणाची कोणाशी युती, कोणाशी कोणाशी आघाडी? हेही कळेनासे झाले आहे. मतदार सर्वच गोष्टींचा विचार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *