2017 च्या तुलनेत पाच टक्क्यांनी घट, घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार?
♦ सिडकोत शहाणे-बडगुजर समर्थक भिडले
♦ ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या तक्रारी सर्वत्र मतदारयाद्यांचा घोळ कायम
♦ पैसे वाटपावरून उमेदवाराच्या बंगल्याची तोडफोड
♦ माजी नगरसेवकाच्या कारमध्ये सापडली रोकड
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी गुरुवारी (दि.15) मतदान पार पडले. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरवात झाल्यानंतर दुपारी दोन-तीन ठिकाणी मतदान यंत्रांत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मतदान खोळंबल्याचे दिसले. दरम्यान, गुरुवारी दिवसभरातील मतदानाची आकडेवारी जुळवण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. मात्र, नाशिक महापालिकेसाठी सुमारे 56.67 टक्के मतदान झाले. एकूण तेरा लाख 60 हजार 722 मतदारांपैकी 7 लाख 71 हजार 132 एवढे मतदान झाले. यात चार लाख 6 हजार 53 पुरुष, तर तीन लाख 64 हजार 696 महिलांनी हक्क बजावला. विशेष म्हणजे, सन 2017 साली महापालिकेसाठी 61.60 टक्के मतदान झाले होते; परंतु यंदा मात्र तब्बल पाच टक्क्यांनी मतदान घटल्याने ते भाजप की शिंदेसेनेच्या पथ्यावर पडणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र, यावरून दोन्ही बाजूंकडून सत्ता आमचीच, असे दावे केले जाऊ लागले आहेत.
भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला
नाशिकरोड प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांच्या घरावर धाव घेतल्याचे दिसले. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणातून शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती.
या दिग्गजांचे भवितव्य ठरणार
सुधाकर बडगुजर
अशोक मुर्तडक
अजय बोरस्ते
दिनकर पाटील
मुकेश शहाणे
शाहू खैरे
प्रवीण तिदमे
नाशिकरोड, मध्य नाशिकसह जुन्या नाशिकमधील काही भागांत बोगस मतदान व पैसे वाटपाच्या आरोपावरून दोन्ही बाजूंचे उमेदवार समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सिडकोत भाजपचे सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे यांचे समर्थक समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती उद्भवली. नाशिकरोडला भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. भाजप आ. देवयानी फरांदे व शिवसेना ठाकरे गटाचे मा. आ. वसंत गिते समोरासमोर आल्याने काहीसा तणाव होता.
दुबई प्रभागात रात्री साडेआठपर्यंत मतदान
दुबई प्रभाग म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक 14 मधील सारडा सर्कल येथील नॅशनल उर्दू स्कूल मतदान केंद्रावर रात्री 8:30 पर्यंत मतदान सुरू होते. दुपारी चारनंतर अचानक गर्दी वाढल्याने या केंद्रावर ही परिस्थिती उद्भवली.
भालेकर शाळा परिसरात शांतता
शहरारीतील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दरम्यान, प्रत्येक निवडणुकीत रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू असलेल्या शहरातील बी. डी. भालेकर शाळा परिसरात गुरुवारी (दि. 15) मात्र शांतता पाहायला मिळाली.
सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यर्ंत एकूण 56 टक्के मतदानाची नोंद झाली.
दरम्यान, 122 जागांसाठी 735 उमेदवारांचे भाग्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर यावर आजच शुक्रवारी (दि.16) 122 जागांचा निकाल जाहीर होणार आहे. नाशिकचा कारभारी कोण, हे ठरले जाणार आहे. नाशिक महापालिकेसाठी गुरुवारी 1,562 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. याकरिता महापालिका प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी 4,860 बॅलेट युनिट व 1,800 कंट्रोल युनिट (राखीव युनिटसह) उपलब्ध करून देण्यात आले होते. निवडणूक कामकाजासाठी एकूण 8800 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी एकूण 735 उमेदवार रिंगणात असून यात 527 राजकीय पक्षांचे उमेदवार व 208 अपक्ष उमेदवार यांचा समावेश आहे. शहरातल्या 31 प्रभागातील 122 जागासाठी मतदान झाले. पहिल्या सत्रात सकाळी साडे सात ते साडे अकरा या चार तासाच 16 टक्के, साडे अकरा ते दीड 26 टक्के तर साडे तीन वाजेपर्यत 39 टक्यावर तर साडे पाच वाजेपर्यत मतदानाची टक्केवारी 56 टक्क्यापर्यत पोहचली.
आ. फरांदे माजी आ. गिते पुन्हा आमनेसामने-बोगस वोटिंगवरून भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार व शिवसेना (उबाठा) नेते वसंत गीते हे समोरासमोर आल्याने द्वारका भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी दुपारी द्वारका परिसरातील एका शाळेच्या मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडला. प्रभाग क्रमांक 15 मधून वसंत गीते यांचे पुत्र प्रथमेश गिते निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपकडून माजी नगरसेवक सचिन मराठी यांच्यासह मिलिंद जाधव मैदानात आहेत. गिते मतदान केंद्रावर आले असता आमदार फरांदेही तेथे आल्या. तसेच त्यांनी मालेगाव येथून बोगस वोटिंग साठी गाड्या भरून आणल्याचा आरोप केला. दरम्यान. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत गर्दी हटवली..
येथील लढतीकडे संपूर्ण शहराचे लागले लक्ष- प्रभाग 1 अरुण पवार (भाजप) विरुद्ध प्रवीण जाधव (शिंदेसेना), प्रभाग 5। गुरुतिम बग्गा विरुद्ध अशोक मुर्तडक (अपक्ष), प्रभाग 7 योगेश हिले विरुद्ध अजय बोरस्ते (शिंदेसेना), प्रभाग 12 शिवाजी गांगुर्डे (भाजप) विरुद्ध समीर कांबळे (शिंदेसेना), प्रभाग 12। डॉ. हेमलता पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) विरुद्ध नूपुर सावजी (भाजप), प्रभाग 13 शाहू खैरे (भाजप) विरुद्ध गणेश मोरे (शिंदेसेना), संजय चव्हाण ( उबाठा) विरुद्ध राहुल शेलार (भाजप ) प्रभाग 15 मिलिंद भालेराव (भाजप) विरुद्ध प्रथमेश गिते (शिवसेना उबाठा), प्रभाग 16 राहुल दिवे (शिंदेसेना) विरुद्ध कुणाल वाघ (भाजप), प्रभाग 17: राजेश आढाव (शिंदेसेना) विरुद्ध दिनकर आढाव (भाजप), प्रभाग 20 संभाजी मोरुस्कर (भाजप) विरुद्ध हेमंत गायकवाड (शिवसेना उबाठा), कैलास मुदलियार (शिंदेसेना), प्रभाग 24 कैलास चुंभळे (भाजप) विरुद्ध प्रवीण तिदमे (शिंदेसेना)
57 percent voting for Nashik Municipal Corporation