प्रभाग 25 मध्ये पैसे वाटपावरून राडा

मुकेश शहाणे-सुधाकर बडगुजर समर्थक भिडले

गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी गुरुवारी (दि. 15) शहरातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये पैसे वाटपावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदानाच्या दिवशी अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट संघर्षात झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, यावेळी झालेल्या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे परिस्थिती तत्काळ नियंत्रणात आली.

प्रभाग क्रमांक 25 मधील सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाच्या आसपास दुपारी 12 च्या सुमारास हा गोंधळ सुरू झाला. सुरुवातीला पैसे वाटपावरून किरकोळ वाद झाल्यानंतर दोन्ही गटांतील कार्यकर्ते आमनेसामने भिडले होते. घोषणाबाजी आणि शाब्दिक चकमक वाढत गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. काही वेळातच पळापळ आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. लाठीचार्जनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या गोंधळाचा मतदान प्रक्रियेवर काही अंशी परिणाम दिसला. तणावपूर्ण वातावरणामुळे अनेक मतदारांनी मतदान केंद्रांकडे जाणे टाळले. काही नागरिक भीतीपोटी माघारी फिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. परिणामी मतदानाचा वेग काही प्रमाणात मंदावला.
परिस्थिती गंभीर होताच पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या प्रभाग क्रमांक 25 मधील वातावरण नियंत्रणात असून, पोलीस प्रशासन सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे.
नाशिक महापालिका निवडणुकीदरम्यान निर्माण झालेला हा तणाव शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडावी, यासाठी प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

Ruckus over money distribution in Ward 25

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *