प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्षामुळे हरसूल रस्त्यावर आंदोलन सुरूच
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
अखिल भारतीय किसान सभेच्या आंदोलकांनी प्रलंबित विविध मागण्यांसाठी हरसूलच्या रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. शनिवार, दि. 17 जानेवारीपासून सुरू असलेले आंदोलन रविवारी कायम राहिले आणि सोमवारीदेखील सुरू राहील, असे दिसते. 60 गावे आणि शेकडो वाडी-वस्ती-पाडे यांची प्रमुख बाजारपेठ हरसूल आहे. प्रशासकीय अधिकार्यांनी पाठ फिरवल्याने बाजारपेठ ठप्प झाली आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्याध्यक्ष कॉ. जिवा पांडु गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. किसान सभेचे सचिव कॉ. इरफान शेख यांनी हरसूल येथे तीव्र आंदोलन छेडले आहे. शनिवार या हरसूलच्या आठवडे बाजाराच्या दिवसाला किसान सभेच्या आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने बाजारपेठ ठप्प झाली आहे. रविवारी आंंदोलकांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनातील संबंधित वरिष्ठ अधिकारी आले नाहीत. शासनाच्या काही विभागांच्या अधिकार्यांनी पाठ फिरवली, तर काही विभागांच्या अधिकार्यांनी हाताखालच्या कनिष्ठ अधिकारी, कर्मचार्यांना पाठवून दिले. अखिल भारतीय किसान सभेने आतापर्यंत लाँग मार्चसारखे आंदोलन छेडले व शासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडले आहे. मात्र, त्यांची अंमलबजावणी करण्यास शासन चालढकल करत आहे. हरसूल येथे प्रतिनिधी म्हणून आलेले कनिष्ठ अधिकारी अथवा कर्मचारी आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याचे अधिकार त्यांच्याकडे नाहीत. साहजिकच आंदोलकांनी आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कायम ठेवला आणि शनिवारप्रमाणेच रविवारीदेखील आंदोलकांनी रस्त्यावर मुक्काम ठोकला आहे.
हरसूल, ठाणापाडा भागात वन, शेती, शिक्षण, वीज, महसूल यांसह सर्व बाबतीत समस्या प्रलंबित राहिल्या आहेत. वारंवार मागणी करूनदेखील त्याबाबत दुर्लक्ष झाले आहे. दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना जीवनमान उंचावण्यासाठी सरकार कोणतीही संधी उपलब्ध होऊ देत नाही. अस्तित्वात असलेल्या योजना अगोदरच तुटपुंज्या आहेत आणि त्यातही त्यांची अंमलबजावणी होत नाही. याबाबत किसान सभेचे कॉ. इरफान शेख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, अशी घोषणा त्यांनी प्रत्यक्षात आणली आहे.
शासनाच्या संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी येथे येऊन आमच्या मागण्यांबाबत निर्णय देत नाहीत तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही. प्रतिनिधी अथवा कनिष्ठ अधिकारी पाठवून आमची खोटी समजूत घालण्याचा प्रयत्न शासनाने करू नये.
-इरफान शेख, सचिव, अखिल भारतीय किसान सभा
The Bharatiya Kisan Sabha has been in session for two days.