नाशिकनगरी गेल्या आठवड्यात विविध सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय घडामोडींनी गजबजून गेली होती. मकरसंक्रांतीच्या सणाला तीळगुळाचे वाटप करीत पतंगोत्सव साजरा होत असताना, दुसरीकडे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. दरम्यानच्या काळातच शहरात नाशिक रन आणि मविप्र मॅरेथॉन यांसारख्या उपक्रमांतून क्रीडा क्षेत्राला बळ मिळाले. त्याच वेळी ख्रिस्ती साहित्य संमेलन, नाणे आणि नोटांचे प्रदर्शन यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणावर मांदियाळी होती. याबरोबरच मराठी भाषेला प्रोत्साहन देणारा उपक्रम कुसुमाग्रज मराठी विचार मंचतर्फे घेण्यात आला होता.
राज्यात मराठी भाषेसाठी काम करणारी कुसुमाग्रज मराठी विचार मंच ही संस्था मराठी भाषेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि सोशल मीडियाच्या विविध साधनांमुळे वाचनाची गोडी कमी होत असल्याने वाचनसंस्कृती वाढावी म्हणून खास तयार केलेल्या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेत आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येते. येत्या शैक्षणिक वर्षात सुमारे तीन लाख मराठीचे उपासक तयार करण्याचे काम केले जाणार आहे.
नाशिक सिंधी शिक्षण मंडळाच्या सिंधुसागर अकॅडमी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे, इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयात शिकणार्या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज मराठी विचार मंच आयोजित मराठीचे उपासक ही पदवी लेखी परीक्षा घेऊन मिळविली, हे अभिमानास्पद आहे. यावेळी सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व साहित्यिक अनिल चौधरी, ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक भगवानदास कच्छेला यांच्यासह मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष दिलीप बारवकर, सरचिटणीस सुभाष सबनीस उपस्थित होते.
माणिक स्वर संगीत कार्यक्रम :
संस्कारभारती नाशिक महानगर यांच्यातर्फे माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त माणिक स्वर हा संगीत कार्यक्रम शंकराचार्य संकुल येथे रंगला. ज्येष्ठ तबलावादक पं. नितीन वारे अध्यक्षस्थानी, तर विनायक रानडे प्रमुख पाहुणे होते. यावेळी विद्या ओक, पं. आनंद अत्रे, अमृता जोशी यांनी वर्मा यांची अजरामर गीते सादर केली. अनघा निमगावकर, रेणुका माळी, पूनम गायकवाड व आदित्य माळी यांनी सहगायन केले.
नाणी व दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन :
देशोदेशीच्या इतिहासासोबतच भारताच्या विविध प्रांतांमधील जुनी नाणी, नोटा, चलने, दुर्मीळ वस्तूंद्वारे उलगडत जाणारा इतिहास अन् छंदिष्टांच्या चेहर्यावर वाढत जाणारी उत्सुकता हे चित्र रविवारी रेअर फेअर प्रदर्शनात बघायला मिळाले. या प्रदर्शनाचा नुकताच समारोप झाला. यात देशभरातून या प्राचीन व दुर्मीळ वस्तूंचा संग्रह बघण्यासाठी हजारो छंदिष्ट नागरिकांनी भेट देत ज्ञानग्रहणासोबतच अनोख्या वस्तूंचे व्यवहार केले. कलेक्टर्स सोसायटी ऑफ न्यूमिसमॅटिक अॅण्ड रेअर आयटम्स यांच्या वतीने रेअर फेअर 2026 हे प्रदर्शन चोपडा लॉन्स येथे घेण्यात आले.
गोदाकाठी रंगला मिस्तुरा आर्ट फेस्ट :
तरुणाईच्या कल्पक बुद्धीतून साकारलेला कलाविष्कार आणि उत्साही वातावरणात नाशिककर गोदाकाठी मिस्तुरा आर्ट
फेस्ट-2026 मध्ये दंग झाले होते. शौर्य सामाजिक संस्थेतर्फे आयोजित या महोत्सवाने गोदाकाठाला कलानगरीचे स्वरूप प्राप्त करून दिले. यावेळी शिल्प, चित्र, गायन-वादन या पारंपरिक कलांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने हा महोत्सवी विशेष महोत्सवात पन्नासहून अधिक स्टॉल आणि शंभरपेक्षा जास्त सादरीकरणांनी महोत्सवात रंगत भरली. लाइव्ह पेंटिंगमध्ये कलाकारांनी प्रेक्षकांसमोरच कॅनव्हासवर रंगांची जादू साकारली.
अ. भा. ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलन
मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळ व मराठी ख्रिस्ती साहित्य संघाच्या वतीने आयोजित सत्ताविसाव्या अखिल भारतीय मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलन नाशिकरोड येथील बाळ येशू देवालयाच्या प्रांगणात पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले. संमेलनाध्यक्ष सायमन मार्टिन, ज्येष्ठ बायबलतज्ज्ञ फादर आयवो कोयलो, बिशप डॉ. थॉमस डिसूझा, संमेलनाचे माजी अध्यक्ष पौलस वाघमारे, प्राचायार्र् डॉ. वेदश्री थिगळे, स्वागताध्यक्ष फादर एरॉल फर्नांडिस विचार मंचावर उपस्थित होते. या संमेलनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वसई येथील फादर फ्रान्सिस कोरिया यांना जीवनगौरव, पुणे येथील सनी पाटोळे यांना साहित्यभूषण, रमण रणदिवे यांना साहित्यव्रती, तर नाशिकच्या मुक्ता टिळक यांना साहित्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मविप्र मॅरेथॉन उत्साहात :
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे पार पडलेल्या दहाव्या राष्ट्रीय, तर पंधराव्या राज्यस्तरीय मविप्र मॅरेथॉन-2026 स्पर्धेतील फुल मॅरेथॉनचे (42.195 किलोमीटर) विजेतेपद हरियाणाच्या मत्तोज कुमार या सैन्य दलातील जवानाने पटकावले. हाफ मॅरेथॉनचे (21 किलोमीटर) पहिले पारितोषिक नाशिक जिल्ह्यातील कमलाकर लक्ष्मण देशमुख याने पटकावले. विशेष म्हणजे, कडाक्याच्या थंडीत रविवारी पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी स्पर्धेला सुरवात झाली. थंडीतही धावपटूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. वेगवेगळ्या 14 गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत पाच हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदविला.
We will become Marathi language speakers, my Marathi is our Pandhari…