विकास की अधोगती..?

आपल्या शहरात जे काही चाललं आहे त्याला सगळे विकास म्हणतात, पण मला प्रश्न पडतो फक्त सिमेंटची जंगलं, मोठमोठी दुकाने, मॉल्स उभी राहणं, मोठाल्या गाड्या म्हणजे विकास का, की स्वच्छ हवा, सुंदर मोकळे रस्ते, चांगल्या शाळा, प्रत्येकाला काम, सुसज्ज हॉस्पिटल, मुलानं खेळायला बागा, बगीचे असणे म्हणजे विकास? ज्याला आपण सध्या विकास म्हणतोय तो आपल्याला अधोगतीला घेऊन जातो आहे. ह्या तथाकथित विकासनी एक मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे ती कचर्‍याची. त्याच कचर्‍याचा शहराला विळखा बसला आहे, गुदमरतो आहे आपल्या शहराचा जीव.
मला आज एक जागरूक नागरिक या नात्याने सर्वांना हेच विचारावे वाटते की, खरंच आपण एक जागरूक नागरिक म्हणून वावरतो का? असेल तर मग का नाही आपले शहर छान सुंदर म्हणून ओळखले जात? कारण त्याला जबाबदार आपणच बरोबर ना? एक नाही तर अनेक समस्या या आपणच निर्माण करतो असे नाही का वाटत? तुम्हाला माझा अनुभव सांगते मी समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते तेव्हा असे जाणवले की जणू परदेशात आहोत. किती छान प्रगती होत आहे. जर असेच सर्व रस्ते सोयीसुविधा झाल्या तर अपघात कमी होतील व आपले नाशिक, महाराष्ट्र, आपला भारत देशसुद्धा काही दिवसांत प्रगत देश बनेल जिथे राहणं अगदी स्वप्नवत असेल, खूप काही विचार मनात येत होते आणि आनंदही वाटत होता. पण क्षणिकच ठरला तो आनंद.
थोड्याच वेळात सर्व चित्रच बदलले. मला सांगा आपण जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा आजूबाजूला झाडे-फुले छान असे क्लीन असेल तेव्हा किती उत्साह वाटतो आणि प्रसन्न वाटते. जणू काही झाडे, फुले आनंदाने आपले स्वागतच करत असतात बरोबर ना?
तसेच परदेशात गेल्यावर प्रवेशद्वाराजवळ छान अशी कमान असते. क्लीन परिसर असतो, तेव्हा आपण लगेच म्हणतो किती छान आहे ठिकाण, पण तुम्ही असा विचार केला आहे का कधी? आपल्या मुंबई-नाशिक महामार्गावर घोटी चढावावर स्वागतासाठी आपण कचरा टाकून ठेवला आहे, तो कसा वाटतो? जेव्हा त्या रस्त्यातून आले तेव्हा मन खूप निराश झालं ती दुर्गंधी बघून आणि मनात आले की, यावर कोणी काही कारवाई का करत नाही? ती आपली जबाबदारी नाही का? कोण हा कचरा टाकत असेल, टाकणार्‍याला एका क्षण ही विषाद वाटत नसेल का? कचर्‍याचा प्रश्न असाच कठीण आहे. आपल्या प्रगतिशील जीवनशैलीमुळे कचरा निर्माण होणे अपरिहार्य आहे. आपण आपले घर स्वच्छ करून कचरा घंटागाडीत टाकतो, ते तो कचरा गोळा करून गावाबाहेर नेऊन एकाच ठिकाणी टाकतात आणि त्याची थोडीफार विल्हेवाट लावता. ज्यांचा कचरा महापालिका स्वीकारत नाही ते असा गावाबाहेर कुठेही टाकतात. जसजशी आपली प्रगती(?) होत जाईल तसतसा जास्त कचरा निर्माण होईल आणि ही समस्या आणखीनच जटिल होईल. इकडचा कचरा तिथे आणि तिथला कचरा आणखी कुठे असा टाकून ही समस्या सोडवता येणार नाही.
कचर्‍यातील प्रत्येक घटकाचा पुनर्वापर हाच त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय आहे. आपली महापालिका आपल्याला आवाहन करतच असते की, सुका आणि ओला कचरा वेगवेगळा द्या. ओल्या कचर्‍याचे खत बनवता येते आणि सुक्या कचर्‍याचे आणखी वर्गीकरण करून (जसे- प्लास्टिक, काच, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक सामान इत्यादी) त्या प्रत्येकाचा पुनर्वापर करता येतो.
जपान हा देश याबाबतीत अग्रेसर आहे, तिथे शून्य कचरा सिस्टिम आहे, कधी होणार आपल्याकडे या गोष्टी, कोण लावणार आपल्याला या साध्या सवयी?
असे खूप प्रश्न येत होते आणि जेव्हा आज सकाळी पेपरला घोटीजवळ रस्त्यावर टाकलेल्या कचर्‍याचा तो फोटो आणि त्याबद्दल वाचले तेव्हा असे जाणवले की, आपल्यासारखे आहेत अजून विचार करणारे कोणीतरी, पण प्रत्येकानेच हा विचार करायला हवा आणि पेटून उठायला हवे. प्रत्येकाने जर त्यादृष्टीने विचार केला तर नक्कीच यश मिळेल व खर्‍या अर्थाने आपले नाशिक हरित, स्वच्छ नाशिक असे म्हटले जाईल!
मला एक प्रश्न नेहमी सतवत असतो आपण जर जागरूक नागरिक आहोत तर आपल्यातली जागरूकता दाखवत का नाही मतदान करताना, योग्य ती व्यक्ती निवडून का देत नाही किंवा खरंच कोणी छान असे काम करते त्याच्या पाठीशी का आपण उभे रहात नाही, न करणार्‍याला जाब का विचारत नाही? ती आपलीच जबाबदारी आहे फक्त निवडून आल्यावर जल्लोष करणं, गुलाल उधळणे, बॅनरबाजी करणे यासाठी लागेल तो पैसा खर्च करणे. त्याऐवजी जर तो पैसा चांगल्या कामासाठी वापरला तर सर्व पैशाचा योग्य असा उपयोग होऊन काही प्रश्न मार्गी लागतील. उदाहरणच द्यायचं झाले तर साध्या साध्या गोष्टी असतात. मी एका ठिकाणी अंत्यविधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते, तर तेथे अशी अवस्था होती की, जळकी तर आहे, पण त्यात पाणी सोडण्याची सोय नाही. स्मशानातील जळकी अर्धवट तुटलेली,आजूबाजूला सर्व कचरा. तिथे रात्रीच्या वेळी लाइटची सोय नाही. पावसामुळे रस्ता खराब झालेला. खूप अशी गैरसोय होती. असे बरेच प्रश्न असतात ते कामे नाही करायचे आणि फक्त मतदानापुरतं आश्वासन द्यायचे. हे सर्व दिसते, पण त्याला कोणीही दुसरा पर्याय देत नाही.
बॅनरबाजी ही शहराला विद्रूप करणारी आणखी एक गोष्ट. निवडणुकीचे, एखाद्या उद्घाटनाचे, लग्नाचे, वाढदिवसाचे, दशक्रिया यांचे बॅनर हे फक्त आणि फक्त आपल्याकडेच लावले जातात. तुम्हाला कधी परदेशात असे बॅनर लावलेले दिसले आहे का? शहर विद्रूप होते, काही काही वेळेला रस्त्यावरचे सिग्नल दिसत नाहीत, वळणावर बॅनर लावल्यामुळे अपघात होतात. किती पैसा वाया जात असेल. बॅनर लावून फक्त स्वतःला मिरवतात. बाकी काही नाही. त्यामुळे समाजाला फायदा तर काही नसतो, पण तोटा खूप जास्त प्रमाणात असतो. तो म्हणजे रस्त्यात अडथळा. त्यामुळे अपघात घडतात. या गोष्टीकडे कोणी लक्षच देत नाही. गेल्या वर्षी रस्त्यात बॅनर पडला म्हणून बिचारा मुलगा उचलण्यासाठी गेला व आपल्या जीव गमावून बसला, तरी यातून कोणीही काहीही शिकत नाही. कशासाठी हा वायफळ खर्च? ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या होत नाहीत. सध्या आपण एक गोष्ट करू शकतो, मतदान करताना त्यातल्या त्यात चांगल्या उमेदवाराला आपण आपले मत देऊ शकतो, ज्याला आपण निवडून आल्यावर जाब विचारू शकू, ज्याच्याकडून चांगली कामं करून घेऊ शकू. छोट्या छोट्या सुधारणांनी समाज बदलत जाईल, प्रत्येकाला सामाजिक जाणीव निर्माण होईल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जाईल आणि आपला देश प्रदेश सर्वांगाने समृद्ध होईल.

Development or decline..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *