मुंबई :
भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतींनी आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी (दि. 19) चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने प्रतिकिलो तीन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली. पिवळा धातू आता दीड लाखाच्या विक्रमी पातळीकडे वाटचाल करत आहे.
चांदीच्या किमतीत सोमवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवर तब्बल 13,553 रुपयांची वाढ झाली. यामुळे एक किलो चांदीचा दर 3,01,315 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला. गेल्या शुक्रवारी बाजार बंद होताना हा दर 2,87,762 रुपये होता. केवळ 19 दिवसांत चांदीच्या दरात सुमारे 65,614 रुपयांची वाढ झाली आहे, जी गुंतवणूकदारांसाठी आश्चर्यकारक ठरली आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर 2,35,701 रुपये होता, जो आज तीन लाखांच्या पुढे गेला आहे.
चांदीच्या पावलावर पाऊल टाकत सोन्याच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. सोमवारी बाजार उघडताच सोन्याचा वायदा भाव प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) 1,45,500 रुपयांवर पोहोचला. वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 31 डिसेंबर 2025 रोजी सोन्याचा दर 1,35,804 रुपये होता. अवघ्या 19 दिवसांत सोने प्रतितोळा सुमारे 9,696 रुपयांनी महागले आहे.
जळगावच्या सराफ बाजारामध्येही या दरवाढीचे मोठे पडसाद उमटले आहेत. येथे सोन्याच्या दरात प्रतितोळा 2,000 रुपयांची, तर चांदीत 10,000 रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह विचार केल्यास, जळगावमध्ये सोन्याचे दर 1,48,000 रुपयांवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 3,03,850 रुपये प्रतिकिलो इतके झाले आहेत. सोन्या-चांदीच्या या अनपेक्षित दरवाढीमागे जागतिक राजकीय तणाव हे मुख्य कारण मानले जात आहे. ट्रम्प यांच्या ‘ग्रीनलँड’ ताब्यात घेण्याच्या योजनेला युरोपीय देशांनी विरोध केल्याने हा तणाव वाढला आहे. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीकडे आपला मोर्चा वळवला आहे, परिणामी मागणी वाढून किमती गगनाला भिडल्या आहेत.