गुंडाच्या मारहाणीमुळे महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

शहाणेंच्या कार्यकर्त्यांकडून कायद्याच्या बालेकिल्ल्यात विजयाचा उन्माद

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या निवडणुकांना अवघे दोन दिवस उलटत नाही तोच कामटवाडे परिसरात गुंडगिरीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चार ते पाच व्यक्तींनी नगरसेवक मुकेश शहाणे व विनोद मगर यांच्या नावाचा संदर्भ देत परिसरात उघडपणे दहशत माजवली. त्यांनी काही नागरिकांना धमक्या दिल्या. मारहाण केल्याची अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, एका महिलेला शहाणे यांच्या माणसांनी मारहाण केल्याने या महिलेने थेट रस्त्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मनपा निवडणुकीच्या दुसर्‍या दिवशी या गुंडांनी कामटवाडे परिसरात खुलेआम धुडगूस घातला. काही नागरिकांना मारहाण करत असताना मार्गावरून जाणार्‍या एका दाम्पत्याने भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त टवाळखोरांनी त्यांनाच लक्ष्य करत दोघांनाही मारहाण केली.
या हाणामारीत एका व्यक्तीला मारले जात असताना त्याची पत्नी मध्ये पडली. आरोपींनी महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत छातीत व पोटात जखमा केल्या, तसेच तिच्या ओढणीच्या माध्यमातून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली.
संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती देताना स्थानिकांनी म्हटले की, या टवाळखोरांचा परिसरात दर दोन-तीन महिन्यांनी दहशत माजवण्याचा इतिहास आहे.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला असून पुढील तपास सुरू आहे. निवडणुकीनंतर अशा प्रकारची उघडपणे गुंडगिरी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि असंतोष पसरला आहे.
दरम्यान, दुसर्‍या दिवशी दुपारच्या सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरात मारहाण झालेल्या व्यक्तीच्या आईने संताप व मानसिक तणावामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केला. रॉकेल ओतून केलेल्या या प्रयत्नात पोलीस व नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप करत अनर्थ टळला. दरम्यान परिसरातील नागरिकांचा संताप वाढला असून, दोषींवर तातडीने कारवाई करून कामटवाडे परिसरात कायद्याचा दबदबा पुनर्स्थापित करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Woman attempts suicide after being beaten by goon

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *