पशुखाद्य,चारा, सुतळीचे दर वाढल्याने आर्थिक संकट

दुहेरी संकटामुळे शेती, पशुपालनासह दुग्धव्यवसाय धोक्यात

निफाड : विशेष प्रतिनिधी
पशुखाद्य, चारा, सुतळीच्या वाढत्या दरामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी आणि पशुपालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पशुखाद्य, चारा व सुतळीच्या वाढलेल्या किमतीमुळे शेती करणे महाग झाले आहे. त्याचा थेट परिणाम शेतकरी कुटुंबाच्या उत्पन्नावर होत आहे. आपल्या कृषिप्रधान देशात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.
अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून गाई, म्हशी घेऊन दुग्धव्यवसाय करतात. त्यामुळे काही कुटुंबांचा उदरनिर्वाह दुधाच्या व्यवसायावर चालतो. दुधाच्या उत्पादन खर्चात यंदा मोठी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत मका व उसाचा हिरवा चारा पाच ते साडेपाच हजार रुपये टन या दराने परिसरात मिळत आहे. 50 किलोंचे 1700 रुपयांस मिळणारे सरकी पेंड खाद्य 1950 ते 2000 रुपयांपर्यंत मिळत आहे. एकीकडे खाद्याचे दर वाढलेले असताना दुसरीकडे दुधाच्या दरात मात्र वेळोवेळी कपात होऊन दुधाचा दर ग्रामीण भागातील डेअरीमध्ये 34 ते 35 रुपये प्रति लिटरप्रमाणे मिळत आहे. मागील वर्षी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुधाळ जनावरे खरेदीसाठी जवळचे पैसे खर्च केले, तर काहींनी बँकेचे कर्ज व उसनवारी पैसे घेऊन गाई-म्हशी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे जनावरे विकताही येईना आणि ठेवताही येईना, अशी अवस्था निर्माण झाल्याने पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने जनावराला खाद्य देणे शेतकर्‍यांना परवडत नाही, तरी चांगल्या प्रतीचे दूध मिळावे म्हणून अधिक झळ सोसून शेतकरी जनावरांना खाद्य घालत आहे. दरवाढीमुळे पशुपालकांनी पर्यायी खाद्याकडे वळण्यास सुरुवात केली आहे. हरभरा, तूर, मूग चूरा, गहू, भुसा यास मागणी असल्याने खाद्यपदार्थांचे दर झपाट्याने वाढले आहे. पशुखाद्याचा खर्च आणि दुधाला मिळणारा भाव यात कुठेच ताळमेळ नसल्याने पशुपालक आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणीत आलेे आहेत.
एकीकडे शेतमालाला हमीभाव मिळत नाही आणि दुसरीकडे पशुखाद्य, सुतळी यांच्या दरवाढीने शेतकर्‍यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सरकारने पशुखाद्य, सुतळी दरावर नियंत्रण आणावे आणि शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

या महिन्यात सरकी पेंडचे दर 40 ते 42 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. सरकी पेंड प्रति 50 किलो बॅग 1950 ते 2000 रुपयांना मिळत आहे. यापूर्वी सरकी पेंडला प्रतिकिलो 33 ते 34 रुपये, बॅग 1650 ते 1700 रुपयांना मिळत होती. खाद्याचे दर वाढल्याने पशुखाद्याचा खर्च, मिळणारा भाव यात कुठेच ताळमेळ बसत नाही. याचा आर्थिक फटका बसत आहे. तसेच गेल्या एक महिन्यात सुतळीमध्ये 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दरवाढ झाल्याने शेतीव्यवसाय करणे मुश्कील झाले आहे. तरी या परिस्थितीत तातडीनेे सरकारने पशुखाद्य, खते, सुतळी यांच्या वाढलेल्या दरांवर नियंत्रण आणावे. शेतकर्‍यांना दिलासा द्यावा.
– अनिल भोर, शेतकरी, चांदोरी

Economic crisis due to increase in prices of animal feed, fodder, and twine

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *