सादरीकरण

जग किती झपाट्याने बदलत आहे याचा अनुभव आपण रोजच घेतो….हल्ली कॉर्पोरेट जगापासून ते सण असो की लग्न असो किंवा छोटे मोठे समारंभ असो. सादरीकरणाला प्रचंड महत्त्व आले आहे.
कॉर्पोरेट जगात सादरीकरण नक्कीच गरजेचे आहे, पण तेच सादरीकरण आपल्या खाजगी जीवनातदेखील जरा जास्तच डोकावते आहे!
अगदी छोट्या छोट्या गोष्टी, पण साजर्‍या करण्यापेक्षा सादर केल्या जातात.. कधीकधी तर वाटते की, फक्त स्टेटसला ठेवण्यासाठी या गोष्टी केल्या जातात की काय!!
सध्या लग्न समारंभाबद्दल काय आणि किती लिहावे कमीच आहे…लग्नाबद्दल सगळंच वाईट आहे असं मुळीच नाही… काही चांगल्या गोष्टीदेखील आहेत जसं की जातीधर्माच्या भिंती गळून पडल्या आहेत! फक्त तरुण पिढीच नाही तर पालकांनीदेखील काळाची गरज ओळखता या गोष्टी स्वीकारल्या आहेत.. हे नक्कीच कौतुकास्पद आहे! शिवाय सासू-सुनेच्या नात्यात तर अमूलाग्र बदल झाला आहे… सासू-सुना आता अगदी मैत्रिणीप्रमाणे राहतात.
…तर सांगायचा मुद्दा हा की, लग्न समारंभ आता साजरे करण्यापेक्षा सादर केले जातात…आधी साखरपुडा मग प्री-वेडिंग शूटिंग या गोष्टी झाल्या की लग्नाच्या आधी मेहंदी, हळद, संगीत मग लग्न आणि शेवटी स्वागत समारंभ.. त्यात पून्हा स्वागत समारंभ मुलीकडे झाला की मग मुलाकडे!!… लग्नात किती खर्च केला.. कशा एक-एक महागातल्या गोष्टी जमवल्या हेच तोंडभरून सांगितले जाते.. असं खर्चिक लग्न बघितले की वाटते.. या सगळ्याची खरंच गरज आहे का??… बरं हे सगळं करतांना निदान श्रीमंत वर्गाकडे मुबलक पैसा तरी असतो… मग याच गोष्टींचे अनुकरण मध्यम आणि कनिष्ठ वर्गदेखील करताना दिसतो.
कोणत्याही गोष्टींचा सारासार विचार न करता फक्त अनुकरण केले जाते…मग असा हा मध्यम आणि कनिष्ठ वर्ग बर्‍याचदा कर्जबाजारी होतांना दिसतो पूर्वीच्या काळात अगदी साध्या पद्धतीने लग्न पार पडायची.. आणि त्यात सासर-माहेर असा सगळ्या कुटुंबाचा सहभाग असायचा..अशा पद्धतीने लग्न साजरे केले जायचे.!!.. पण आताच्या धकाधकीच्या जीवनात कोणालाही वेळ नाही…
आता आपल्या दिमतीला इव्हेंट मॅनेजमेंट वाले, फोटोग्राफर्स, कॉरिओग्राफर्स आहेत..आणि हे सगळे लग्न सादर करतात!!… लग्न जास्तीत जास्त फिल्मी कसे करता येईल यासाठी ते धडपडत असतात. काळाबरोबर आपल्याला नक्कीच बदलावं लागणार.. नवीन पिढीलासाठी हे सादरीकरण गरजेचेही असेल कदाचित!! पण मग काळाबरोबर या गोष्टी आपण स्वीकारतो आहे.. तर काळाबरोबर अजून काही गोष्टी नवीन पिढीला नक्की सांगाव्यात.!!. लग्न ही एक प्रकारची आयुष्यभराची प्रेमाची, त्यागाची, समर्पणाची बांधिलकी आहे.!!. इतके सारे प्रोफेशनल्स आपण लग्नासाठी मदतीला घेतो तर अजून एक प्रोफेशनल मदतीला घ्यावा तो म्हणजे मॅरेज कौन्सिलर (विवाह-समुपदेशक).. कारण लग्नानंतर आयुष्यात खूप सार्‍या जबाबदार्‍या येतात.. त्यातील सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे मुलांची… आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर द्यावा.
यामुळे लग्न नुसते सादर न होता साजरेदेखील होतील!

Presentation

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *