सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
सिडको : विशेष प्रतिनिधी
जमीन खरेदी करत असल्याचा बहाणा करून ओळखीच्या व्यक्तीकडून घर गहाण ठेवून साडेअडतीस लाख रुपये घेतल्यानंतर कोणतीही जमीन खरेदी न करता रक्कम स्वतःच्या वापरात आणून, गहाण ठेवलेली मिळकत परस्पर विक्री केल्याप्रकरणी एकाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुंडलिक सयाजी गांगुर्डे (वय 62, व्यवसाय व्यापार, सध्या रा. प्लॉट क्रमांक 03/ए, मुरकुटे कॉलनी, नवीन पंडित कॉलनी, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रामराव किसन शिंदे (रा. रो-हाउस क्रमांक 06, पाटील गार्डन, पेठेनगर रोड, चार्वाक चौक, इंदिरानगर, नाशिक) असे संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी व आरोपी यांची पूर्वओळख असून, आरोपीने मोठी जमीन खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत फिर्यादीकडून प्लॉट क्रमांक 03/ए, मुरकुटे कॉलनी येथील घर गहाण ठेवून 38 लाख 25 हजार रुपये घेतले. यासंदर्भात ताबे गहाण करारनामा करण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात आरोपीने कोणतीही जमीन खरेदी केली नाही. तसेच फिर्यादीकडून घेतलेली रक्कम परत न करता स्वतःच्या
वापरात आणली.
याशिवाय, गहाण ठेवलेली मिळकत फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डगळे
करीत आहेत.