ना. गिरीश महाजन : विकासकामांतून पदाचा नावलौकिक वाढवा
नाशिक : प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे व अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत जनतेने भारतीय जनता पक्षास भरघोस मतांचे दान मतदानाद्वारे दिले आहे. त्यामुळे मतदारांचे हित जोपासण्यासाठी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी परिश्रम घ्यावे. शहराच्या विकासकामांतून आपल्या पदाचा नावलौकिक वाढवावा, असा कानमंत्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन
यांनी दिला.
नवनिर्वाचित नगरसेवकांचा भाजपा कार्यालयात काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होेते. यावेळी जळगाव महापालिकेत निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमधून गटनेता, उपगटनेता व प्रतोदपदाची निवड मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगाव महानगरपालिका गटनेता म्हणून प्रकाश बलाणी, उपगटनेता म्हणून नितीन बरडे व प्रतोदपदी डॉ. चंद्रशेखर पाटील यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमाताई हिरे, जळगावचे आमदार राजू मामा भोळे, जळगाव शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, अरविंद देशमुख, लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उत्तर महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये जनतेने मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पक्षाच्या हाती महानगरपालिकेची सूत्रे दिली असल्याने त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रसंगी सांगितले. महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेल्या विजयाने भारतीय जनता पक्ष येणार्या निवडणुकीमध्ये अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जनतेसाठी शंभर चकरा शासकीय कार्यालयांत माराव्या लागल्या तरी चालतील, मात्र जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे, असेही शेवटी गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट करून नवनिर्वाचित नगरसेवक, तसेच निवड करण्यात आलेले गटनेता, उपगटनेता व प्रतोद यांचे अभिनंदन केले. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी लवकरच कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग घेणार असल्याचेही मंत्री गिरीश महाजन यांनी शेवटी
बोलताना सांगितले.
Training class for newly elected corporators