प्रहार जनशक्ती पक्षाच्या धरणे आंदोलनाने तालुक्यात चर्चेला उधाण
सिन्नर : प्रतिनिधी
नाशिक-पुणे रेल्वे म्हणजे सिन्नरकरांसाठी केवळ प्रवासाची सोय नाही, तर रोजगार, उद्योग आणि भविष्याशी जोडलेली आशा आहे. मात्र, या स्वप्नाला दिशा कोणती, यावरच आता मतभेद उफाळले आहेत. एकीकडे नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गेच व्हावी, यासाठी तालुक्यात जोरदार जनआंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे प्रहार जनशक्ती पक्षाने वेगळ्या मार्गाची मागणी केल्याने सिन्नरकरांचा गोंधळ वाढला आहे.
गुरुवारी (दि. 22) प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सिन्नरच्या इंडियाबुल्समार्गे शिर्डी-पुणे रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली. पक्षाने दिलेल्या निवेदनात तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आलेला नाशिक-नारायणगाव रेल्वेमार्ग एकलहरे-गुळवंच इंडियाबुल्स मार्गे पुन्हा सुरू करावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
यासोबतच सिन्नर शहरात स्वतंत्र रेल्वेस्थानक उभारावे, तसेच रखडलेला इंडियाबुल्स प्रकल्प तातडीने सुरू करून बेरोजगारी कमी करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष कैलास दातीर, संगीता आगळे, चंद्रकांत डावरे, पांडुरंग आगळे, भास्कर दराडे, खंडू सांगळे, आनंदा सोनवणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, रेल्वेमार्ग आणि उद्योग सुरू झाल्यास सिन्नरमधील तरुणांचे स्थलांतर थांबेल आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास नाशिक लोकसभा मतदारसंघात जनजागृती आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाने दिला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्यापूर्वी किमान दोन लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे.
Disagreement over railway line; Confusion in Sinnarkar’s dream