पुष्प सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक : प्रतिनिधी
‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा.लि.’ संचालित बसवंत गार्डन (मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड, जि. नाशिक) येथे दि. 23 ते 27 जानेवारीदरम्यान आयोजित पुष्पोत्सवाचे, तसेच पुष्प सजावट स्पर्धेची सुरुवात पिंपळगाव बसवंतचे नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे आणि मुख्याधिकारी श्रिया देवचके या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. शेतकर्यांच्या दर्जेदार उत्पादनांची नागरिकांना ओळख व्हावी व योग्य बाजारपेठ मिळून त्यांचे मूल्यवर्धन व्हावे, या हेतूने जानोरी फ्लॉवर्सअंतर्गत बसवंत पुष्पोत्सव- उत्सव फुलांचा या उपक्रमाचे येथे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ज्येष्ठ कृषितज्ज्ञ डॉ. बी. बी. पवार, ग्रीनझोनचे कार्यकारी संचालक संजय पवार, बसवंत गार्डनचे प्रकल्प संचालक संदीप वाघ, संदीप सोनवणे, राज बागूल उपस्थित होते. यावेळी घेतलेल्या पुष्पगुच्छ व पुष्प सजावट स्पर्धेत विविध वयोगटांमधील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पुष्पगुच्छ स्पर्धेत प्रथम रु. 5001, द्वितीय रु. 3001, तृतीय रु. 2001, तर उत्तेजनार्थ तीन (प्रत्येकी रु. 1001). त्याचप्रमाणे पुष्प सजावट स्पर्धेत प्रथम रु. 5001, द्वितीय- रु. 3001, तृतीय- रु. 2001 आणि तीन उत्तेजनार्थ (प्रत्येकी रु. 1001) अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण अवधूत देशपांडे यांनी केले. या पुष्पोत्सवाच्या शुभारंभाला तीनशेहून अधिक फूल उत्पादक शेतकर्यांसह अनेक पर्यटकांची उपस्थिती लाभली. 27 जानेवारी 2026 पर्यंत याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Baswant Garden’s flower festival begins