कृती समितीचा 31 जानेवारीला गोंदे फाटा येथे आंदोलनाचा इशारा
सिन्नर ः प्रतिनिधी
नाशिक-पुणे जलदगती रेल्वे मार्गाचे मूळ संरेखन रद्द करून पुणे-अहिल्यानगर-पुणतांबा-साईनगर शिर्डी-नाशिक असा वळणदार व अव्यवहार्य नवीन मार्ग निश्चित केला जात असल्याच्या हालचालींविरोधात सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने 31 जानेवारी रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा
दिला आहे.
नाशिक-पुणे जलदगती रेल्वे ही नाशिक-सिन्नर-अकोले-संगमनेर-नारायणगाव-राजगुरूनगर-चाकण या मूळ, सरळ व लोकहिताच्या मार्गानेच राबविण्यात यावी, अशी ठाम मागणी समितीने केली आहे. हा मार्ग शेतकरी, उद्योजक, व्यापारी, पुण्यात शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच आयटी क्षेत्रात कार्यरत युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा व उपयुक्त असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
या मागणीसाठी सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीने गावोगावी दौरे करून जनजागृती करण्यात आली. या दौर्यादरम्यान शेतकरी, नागरिक व व्यापारी वर्गाकडून आंदोलनाला
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे
समितीने सांगितले. 31 जानेवारी रोजी गोंदे फाटा येथे समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, त्याबाबतचा अर्ज वावी पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीने संगमनेर येथे आमदार सत्यजित तांबे यांची भेट घेऊन रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. आमदार तांबे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह आंदोलनात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. कोतुळ येथे झालेल्या रेल्वे परिषदेत डॉ. अजित नवले यांनी अकोले तालुक्यातून हजारो नागरिकांसह 31 जानेवारीच्या समृद्धी महामार्गावरील रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेण्याचे जाहीर केले. यावेळी अकोले व संगमनेर परिसरातील नागरिकांना मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या रेल्वे परिषदेत रेल्वे कृती
समितीचे हरिभाऊ तांबे, भाऊसाहेब शिंदे, अॅड. संजय सोनवणे, प्रा. राजाराम मुंगसे, सीमा संघटनेचे सचिव बबनराव वाजे व संकल्प भालेराव उपस्थित होते.
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे विद्यार्थ्यांनी पदयात्रा काढून आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. त्याच धर्तीवर सिन्नर तालुक्यातील शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी रेल्वे कृती समितीच्या समर्थनार्थ जनजागृती फेरीचे आयोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, काल (दि.24) सकाळी भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांनी दापूर येथे चौकसभा घेत नाशिक-पुणे रेल्वेचा संगमनेर-आळेफाटा-राजगुरूनगर-चाकण मागर्र् विद्यार्थी, व्यापारी व उद्योजकांसाठी किती फायदेशीर आहे हे सविस्तरपणे स्पष्ट केले. तसेच हजारोंच्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
Attempt to disrupt the original alignment of Nashik-Pune railway