ऋतुराज आज वनी आला, नवसुमनांचा, नवकलिकांचा बहर घेऊनी आला….
सर्व ऋतुंमधील राजा चैत्राच्या आगमनाचे वर्णन करणारे हे गीत साऱ्या सृष्टीतील आनंदाचे संपन्नतेचे प्रतीकच आहे. सरता हिवाळा, थंडीचा कडाका संपून कडक उन्हाळ्याच्या झळा सहन करण्यापूर्वीचा हा प्रसन्न काळ. होळीच्या सणानंतर रंगपंचमीची बहार येते. सर्वजण उत्साहात हा सण साजरा करतात आणि मग वेध लागते ते नववर्षाच्या स्वागताचे अर्थात गुढीपाडव्याचे. या पुर्वीचा सण होलीकोत्सव म्हणजेच आसुरी प्रवृत्तींचा विनाश, वाईट विचारांचे दहन करणे व भगवंताच्या सान्निध्याचा रंग प्राप्त करणे होय. परमपिता शिव परमात्म्याच्या दिव्य अवतरणाने यांनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशाने या विश्वाचे परिवर्तन होते. सर्व वाईट, दुख:दायक अनिष्ट ते संपून, संपूर्ण सुख शांती व पावित्रतेचे राज्य येते. या सुखाच्या राज्याचे प्रतीक म्हणजेच गुढीपाडवा. असे सागितले जाते की जेव्हा श्रीराम रावणावर विजय प्राप्त करुन अयोध्या नगरीत परतले त्यावेळी सर्व नगरी गुढया व तोरणांनी सुशोभित केली होती. एवढेच नव्हे तर एखादया विशेष कार्यासंदर्भात ही असे म्हटले जाते की अमुक व्यक्तीने विजयाची गुढी उभारली.छत्रपति शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची गुढी उभारली असे म्हणण्याचा प्रघात आहे. एकुण काय तर कोणत्याही शुभ व अलौकिक गोष्टीसाठी ‘गुढी उभारणे’ हा शब्दप्रयोग केला जातो.
चैत्र शुध्द प्रतीपदा अर्थात नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही घरोघरी गुढया उभारण्याची पध्दत आहे. ही गुढी म्हणजेच भविष्यात येणाऱ्या सुखाच्या शांतीच्या व संपन्नतेच्या दुनियेचे प्रतीक आहे. घराच्या अंगणात उंचावर गुढी उभारली जाते अर्थात नवीन दुनियेतील मनुष्यआत्म्यांची उच्च आत्मिक स्थिती दर्शवते. गुढीसाठी वापरलेले नवीन वस्त्र त्या काळातील संपन्न अवस्था दर्शवते. गुढीवरील कलश शिवपरमात्म्याने दिलेल्या ज्ञानाचा कलश असुन गुढीला अर्पण केलेल्या फुलांच्या व फळांच्या माळा सदा सुखदायक व सुजलाम् व सुफलाम् निसर्गाचे द्योतक आहेत. गुढीवर शोभणारी साखरेच्या पदकांची माळ परिवर्तित दुनियेतील मनुष्यांच्या आपआपसातील निःस्वार्थ व्यवहाराचे प्रतीक आहे. या दुनियेतील मनुष्यांची वाणी गोड असुन एकमेकांशी वागणेही तितकेच निर्मळ असणार आहे. गुढीवरील कडुलिंब पुन्हा एकदा नैसर्गिक संपन्नता दर्शवतो तसेच मनुष्यांच्या संपूर्ण निरोगी जीवनाची ग्वाही देतो, म्हणजेच गुढीपाडव्याची गुढी ही केवळ एका दिवसापुरतीच नसून आपल्या मनात व आचरणात अशी ही गुढी नेहमीच उभारलेली असावी यातूनच सुखी संपन्न युगात अर्थात सत्य युगामध्ये आपल्याला जायला मिळेल.
या दिवशी विशेष गोडधोडचा स्वयंपाक केला जातो व सर्वत्र आनंद साजरा केला जातो. परंतु काय हा एक दिवसाचा आनंद पुरेसा आहे? जर सर्व जीवनच अशा आनंदाने भरले तर निश्चितच सर्वांना आवडेल अनेकांना असा प्रश्न पडतो की खरोखरच अशी दुनिया असेल का? असेल तर कोण घडवेल ? या प्रश्नांचे उत्तर भगवद्गीतेत, भगवंताने सांगितले आहे. जेव्हा धर्माची ग्लानी होऊन सर्वत्र दुःख अशांती चे साम्राज्य पसरते तेव्हा मी या सृष्टीवर अवतारीत होऊन एका सत्धर्माची स्थापना करुन संपूर्ण सुखशांती व पवित्रतेचे राज्य स्थापन करतो अश्या भगवंताने दिलेल्या या वचनानुसार त्यांचे दिव्य अवतरण या सृष्टीवर झाले आहे. आज भगवंताने दिलेल्या ज्ञानाच्या आधारे अनेक मनुष्यात्मे स्वतःत परिवर्तन घडवत आहेत. जेव्हा मानवाच्या विचारात परिवर्तन घडेल तेव्हाच त्याचे आचरण शुध्द होईल. भगवंताने दिलेल्या ज्ञानामुळे आपल्याला आपल्यातील वाईट विचारांवर विकारांवर विजय मिळवणे सहज शक्य होते. जेव्हा सर्व मानव अशा शुध्द विचारांनी परिपूर्ण होतील तेव्हाच या सृष्टीवर नवयुगाची सुरवात होईल जे संपूर्ण सुखशांतीमय असेल.
म्हणूनच बंधू-भगिनींनो शिव भगवंताने दिलेल्या ज्ञानाने आपण सुध्दा पावन बनुन नवयुगाच्या स्वागताची गुढी उभारुया….
पुष्पा दीदी